इंदूर: इंदूरच्या बाणगंगा पोलीस स्टेशन हद्दीतील गोविंद कॉलनीमध्ये एका तरुणाला होळी साजरी करतानाच जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एकीकडे होळी सुरु होती आणि दुसरीकडे तरुण बेधुंद होऊन नाचत होता. पण अचानक तरुणाने चाकू काढून नाचता नाचता स्वतःच्याच छातीवर वार केले. यावेळी गंभीर जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आता या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले असून, ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ADVERTISEMENT
होलिका दहनाच्या कार्यक्रमात डीजेच्या तालावर नाचत होता तरुण
ही घटना इंदूरच्या बाणगंगा पोलीस स्टेशन परिसरातील गोविंद कॉलनीतील आहे. येथे राहणारा गोपाल (वय 38 वर्ष) हा तरुण होलिका दहनाच्या कार्यक्रमात डीजेवर नाचत होता. गाण्यावर नाचत असतानाच त्याने हातात चाकू घेतला आणि छातीवर वार करण्यास सुरुवात केली. यावेळी चाकू गोपालच्या छातीत खोलवर घुसल्याने त्याच्या छातीतून प्रचंड रक्तस्त्राव होऊ लागला.
मद्यधुंद अवस्थेत नाचत होते अनेक तरुण
दरम्यान, गोपाल याला मित्रांनी आणि नातेवाईकांनी जवळच्या रुग्णालयात दाखलही केले. पण चाकूचा घावा वर्मी बसल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये नाचणाऱ्या सर्व तरुणांनी दारूचं सेवन केल्याचं सांगितलं जात आहे.
बाणगंगा पोलिस स्टेशनचे तपास अधिकारी योगेश सिंह यांनी सांगितले की, मृत गोपालचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी अरबिंदो हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला असून सध्या तपास सुरू करण्यात आला आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, मृत गोपाल हा विवाहित होता आणि तो मुलगा आणि आई-वडिलांसोबत राहतो. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
दरम्यान, ऐन होळीच्या सणात गोपालने अशा प्रकारचं कृत्य का केलं? याविषयी देखील पोलीस शोध घेत आहे. अचानक त्याने स्वत:वरच वार का करुन घेतले याबाबत तेथील उपस्थित आणि त्याच्या नातेवाईकांकडे चौकशी सुरु करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT