उसने पैसे दिलेल्या महिलेचीच हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना कल्याण पूर्वमध्ये घडली आहे. आरोपीने महिलेवर चाकूने सपासप वार करत हत्या केली आणि स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन हत्येची कबूली दिली. मयत महिलेचं नाव रंजना राजेश जैसवार (वय ४५ ) असून, कोळसेवाडी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेतील शास्त्रीनगर, चक्कीनाका परिसरात रंजना राजेश जैसवार आपल्या कुटुंबासोबत राहत होत्या. त्या एका ब्युटीपार्लरमध्ये कामाला होत्या. रंजना जैसवार यांचे अजय राजभर याच्याबरोबर मैत्रीचे संबंध होते. त्यामुळे त्यांनी अजय राजभरला १ लाख रुपये उसने दिलेले होते.
पुण्यात संतापजनक घटना! १२ वर्षीय मुलीवर ३५ वर्षीय नराधमाने केला बलात्कार
दरम्यान, रंजना या नेहमी अजय राजभर यांच्याकडे उसने दिलेले पैसे मागण्याकरिता जायच्या. मात्र, अजय राजभर हा पैसे देण्यास टाळाटाळ करत होता. त्यामुळे रंजना आणि अजय राजभर यांच्यात परिवारासोबत वाद झाला होता.
त्यानंतर ९ एप्रिल रोजी रात्री दहाच्या सुमारास कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सार्वजनिक शौचालयाच्या बाजूला असलेल्या अजयच्या घरी रंजना पैसे मागण्यासाठी गेल्या होत्या, मात्र अजय घरी नव्हता. घरी अजयचा भाऊ विजय व त्याची आई लालसादेवी राजभर हे होते. यावेळी रंजना यांचं अजयचा भाऊ आणि आईसोबत भांडण झालं. वाद विकोपाला गेल्यानंतर त्या दोघांनी रंजना यांच्या पोटावर, पाठीवर, छातीवर, गळ्यावर तसेच डाव्या बाजूच्या काखेत चाकूने वार केले. यात गंभीर जखमी झालेल्या रंजना यांचा मृत्यू झाला.
औरंगाबादच्या कीर्तनकार महाराजाच्या ‘पॉर्न फिल्म’ने खळबळ; व्हिडीओची राज्यात चर्चा
घटनेनंतर १० एप्रिल रोजी सकाळी आरोपी विजय स्वतः कोळसेवाडी पोलीस ठाण्यात जाऊन हत्या केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे घटनास्थळी गेले. तिथे असलेला रंजना यांचा मृतदेह पोलिसांनी पंचनामा करून ताब्यात घेतला. त्यांनतर त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेतला. रंजना यांचे पती राजेश जैसवार यांची फिर्याद घेऊन कोळसेवाडी पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम ३०२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहा.पोलीस आयुक्त उमेश माने पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम करीत आहे.
ADVERTISEMENT