लाइव्ह

Manoj Jarange Live : मराठ्यांच्या मागण्या मान्य, पण ‘तो’ प्रश्न अनुत्तरीत, अशोक चव्हाण काय म्हणाले?

मुंबई तक

27 Jan 2024 (अपडेटेड: 27 Jan 2024, 05:47 PM)

Manoj Jarange Patil Live updates Navi Mumbai : मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या सात मागण्या सरकारकडून पूर्ण करण्यात आल्या आहेत. जरांगे पाटील यांनी २६ जानेवारी पासून उपोषण सुरू केले होते. ते आज (२७ जानेवारी) उपोषण सोडणार आहे. यासंदर्भातील सर्व अपडेट्स आणि वाशीमध्ये काय घडतंय पहा थेट…

Mumbaitak
follow google news

लाइव्हब्लॉग बंद

  • 07:55 PM • 27 Jan 2024
    मराठ्यांच्या मागण्या मान्य, पण तो प्रश्न अनुत्तरीत - अशोक चव्हाण
    मराठ्यांचा विजय झाला ही आनंदाची बाब आहे. ज्यांच्याकडे पूर्वीच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना आणि सागेसोयरे असा शब्द वापरण्यात आलेला आहे. आरक्षणात मराठ्यांची संख्या वाढेल.शासनाने अध्यादेश काढला,त्यावर हरकती सूचना मगवण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागणार, मला अशा आहे हा विषय स्वागतार्ह आहे.त्यातून बऱ्या प्रमाणात नोंदी असलेल्यांना फायदा मिळेल अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री तथा मराठा आरक्षण उमसमितीचे माजी अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली.
  • 03:12 PM • 27 Jan 2024
    फडणवीसांनी जरांगेंचं केलं अभिनंदन, छगन भुजबळांनाही दिला मेसेज
    "मला अतिशय आनंद आहे की, एक चांगला मार्ग निघाला आहे. आमच्या सरकारने सकारात्मकता दाखवली होती. यामुळे मराठा बांधवांचा प्रश्न सुटणार आहे. मनोज जरांगे यांचे अभिनंदन करतो", असं सांगताना फडणवीसांनी छगन भुजबळांनाही आवाहन केले. "छगन भुजबळ यांना मी सांगू इच्छितो की ओबीसी वर अन्याय होईल असं काहीही सरकार करणार नाही.त्यांचा पण समाधान होईल", असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
  • 02:36 PM • 27 Jan 2024
    अजित पवारांनी केले एकनाथ शिंदेंचे तोंडभरून कौतुक
    सगे सोयरे शब्दाची व्याख्या ठरवण्याबद्दल अध्यादेश काढण्यासंबंधी राज्य सरकारने अधिसूचना काढली आहे. अधिसूचना काढल्यानंतर मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं. मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेत आनंद व्यक्त केला. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं तोंडभरून कौतुक केलं. सातारा जिल्ह्यातील औंध येथील कार्यक्रमात अजित पवार बोलत होते.
  • 12:11 PM • 27 Jan 2024
    ओबीसींबर अन्याय की मराठ्यांची फसवणूक; भुजबळांनी व्यक्त केली शंका
    छगन भुजबळ म्हणाले, "ही जी आहे एक सूचना आहे. याचं रुपांतर नंतर होणार आहे. १६ फेब्रवारीपर्यंत यावर हरकती मागवण्यात आलेल्या आहेत. ज्यावेळी हरकती देऊ, त्यानंतर असा पद्धतीचे नोटिफिकेशन झालं. हा ड्राफ्ट आहे. हा अध्यादेश नाही, हा नोटिफिकेशनचा एक मसुदा आहे. १६ फेब्रवारीपर्यंत यावर हरकती घेता येणार आहे. त्यावर शासन ठरवते. ते जर ठरले, तर मग कोर्टात जाईल. तोपर्यंत आमचा अभ्यास सुरू राहील."
  • 10:58 AM • 27 Jan 2024
    आम्ही मतासाठी नाही, तर...; एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा
    मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सोडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजर होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "आम्ही मतासाठी नाही, तर हितासाठी निर्णय घेतले आहेत. सर्वसामान्यांना न्याय देणारे निर्णय सरकारने घेतले आहे. मराठा समाजाचा संघर्ष आहे. मराठा समाजाने अनेक लोकांना मोठं केलं. अनेकांना मोठंमोठी पदे मराठा समाजामुळे मिळाली. पण, जेव्हा मराठा समाजाला न्याय देण्याची संधी मिळाली, तेव्हा ती द्यायला पाहिजे होती. आजचा दिवस आनंदाचा आहे. गुलाल उधळण्याचा दिवस आहे", असेही एकनाथ शिंदे म्हणाले."मनोज जरांगे पाटील यांनी मला सांगितले की, आमच्या मागण्या पूर्ण केल्या, पण आमच्यासाठी तुम्ही इकडे आलं पाहिजे. तुमच्यासाठी प्रेमामुळे इकडे आलो आहे. मराठवाड्यात कुणबी नोंदी सापडत नव्हत्या. आता त्या सापडू लागल्या आहेत. कारण सरकारची मानसिकता देण्याची आहे, घेण्याची नाही. गावागावात देखील मराठा-ओबीसी नांदतो. त्यांनी सांगितलं की, आम्हाला कुणाच्या हक्काचं घ्यायचं नाही, पण आमच्या हक्काचं पाहिजे. एका सर्वसामान्य माणसाच्या मागे आपण उभं राहिलात. मुख्यमंत्री देखील सर्वसामान्य माणूस आहे. त्यामुळे आपल्या सरकारने न्याय देण्याचं काम केलं आहे", असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले."कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी शिबिरे आपण लावली आहेत. शिंदे समितीला मुदतवाढ दिली आहे. वंशावळी जुळवण्यासाठी समित्या स्थापन केल्या आहेत. टिकणार आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला ओबीसींच्या सवलती दिल्या जातील. एक मराठा लाख मराठा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. संयमाने आंदोलन केलं. आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना वाऱ्यावर सोडणार नाही. सरकारचं कर्तव्य म्हणून प्रत्येकी १० लाख रुपये दिले आहेत. नोकऱ्याही देणार आहोत. या सरकारचे जे निर्णय आहेत, त्याची अमलबजावणी सरकार करेल हा शब्द मी देतो. मनोज जरांगे पाटील यांचं अभिनंदन करतो", अशा भावना शिंदे यांनी व्यक्त केल्या.
  • 10:38 AM • 27 Jan 2024
    मागण्या मान्य झाल्यानंतर जरांगे पाटलांचं भाषण
    उपोषण सोडल्यानंतर मनोज जरांगे पाटील म्हणाले, "५४ लाख मराठा समाजाच्या नोंदी वाटप करण्यात याव्यात. त्यांच्या कुटुंबातील लोकांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावेत. तिसरी मागणी होती की, ज्याची नोंद सापडली त्याच्या सगेसोयऱ्यांनाही जात प्रमाणपत्र द्यावे, यासाठी आपण मुंबईत आलो होतो. मी शिंदेंना एकच विनंती करणार आहे की ३०० पेक्षा जास्त मराठा समाजातील व्यक्तींनी आत्महत्या केल्या.अनेकींच्या कपाळाचं कुंकू पुसलं गेलं. ज्यांनी बलिदान दिलं, त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावर होती."
  • 10:18 AM • 27 Jan 2024
    मनोज जरांगे यांनी उपोषण सोडलं
    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातून ज्यूस पिऊन मनोज जरांगे यांनी उपोषण सोडले.
  • 10:10 AM • 27 Jan 2024
    शिंदेंनी घेतली जरांगेंची भेट
    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन आणि दीपक केसरकर यांच्यासह वाशी येथे पोहोचले. मुख्यमंत्री शिंदेंनी मनोज जरांगे यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर आता सभा होत आहे.
  • 09:47 AM • 27 Jan 2024
    मनोज जरांगे उपोषण सोडणार
    मराठा आरक्षणासाठी मुंबईत आलेल्या मनोज जरांगे यांच्या सात मागण्या शिंदे सरकारने मान्य केल्या आहे. शिंदे सरकारने सगेसोयरे शब्दाची व्याख्या करणारी अधिसूचना काढली आहे. त्यानंतर आता जरांगे पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातून ज्यूस पिऊन उपोषण सोडणार आहे.
follow whatsapp