मुंबई: अँटेलिया संशयित कार प्रकरणी अटकेत असलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अडचणीत आता आणखी वाढ होणार आहे. कारण याच केसशी निगडीत असणाऱ्या मनसुख हिरेन यांच्या हत्या प्रकरणाचा तपास आता एनआयएकडे सोपविण्यात आला आहे. यापूर्वी या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र एटीएसकडे होता. मात्र याप्रकरणी एटीएसला फार गती मिळाली नसल्याने आता हा तपास एनआयएकडे सोपविण्यात आला असल्याचं समजतं आहे.
ADVERTISEMENT
दरम्यान, मनसुख हिरेन हत्या प्रकरण NIAकडे हस्तांतरित करण्याबाबतची अधिसूचना देखील जारी झाली आहे. एनआयएच्या प्रवक्त्याने या संदर्भातील आदेश प्राप्त झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
सुरुवातीला संशयित स्कॉर्पिओ कारमध्ये जिलेटीनच्या कांड्या सापडल्याने त्या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपविण्यात आला होता. त्यानंतर एनआयएने चौकशीअंती पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक केली होती. दुसरीकडे याचसंबंधी मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास हा महाराष्ट्र एटीएस करत होता. पण आता या प्रकरणी एनआयए तपास करणार आहे.
Sachin Vaze आणि मनसुख हिरेन १७ फेब्रुवारीला भेटले, सीसीटीव्ही फुटेज समोर
NIA कडे कोणत्या आधारे सोपविण्यात आला मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास?
अँटेलिया स्फोटकं प्रकरणात सुरुवातीला एनआयए तपास करत होती. त्यामुळे मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास एनआयए करु शकतं की नाही? असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जात होता. पण अशाप्रकारचा तपास एनआयए करु शकतं.
कारण NIA कायद्याच्या कलम 8 अंतर्गत परस्पर निगडीत प्रकरणाची चौकशी एनआयए करु शकतं. याच कलमानुसार आता एनआयए अँटेलिया कार प्रकरणासोबत मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास देखील करणार आहे.
दरम्यान, अँटेलिया प्रकरणात सर्वात धक्कादायक संशय हा मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांनी केला होता. ‘सचिन वाझे यांनीच माझे पती मनसुख हिरेन यांची हत्या केल्याचा संशय मला आहे.’ असा संशय मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला यांनी त्यांच्या कबुली जबाबात व्यक्त केला होता.
‘मुंबई पोलिसांपासून सचिन वाझेंना सुरक्षित ठेवा नाहीतर, त्यांचाही मनसुख हिरेन होऊ शकतो’
पाहा विमला हिरेन यांनी पोलिसांनी दिलेल्या जबाबात सचिन वाझेंचं नाव का घेतलं होतं?
माझे पती मनसुख हिरेन हे क्लासिक कार डेकोर नावाचे ऑटोमोबाईल अॅक्सेसरीज विक्रीचा व्यवसाय करत होते. सदर दुकान हे ठाण्यातील वंदना टॉकिजच्या जवळ आहे. माझे पती मनसुख हिरेन हे ९८२०२१४२८२ हा व्हीआय कंपनीचा आणि ९३२४६२८२७२ जिओ कंपनीचे सिमकार्ड एकाच मोबाईलमध्ये वापरत होते. मोबाईल हँडसेटचे मॉडेल वन प्लस ६ असा होता. माझ्या पतीचा ईमेल आयडी mansukhhiran456@gmail.com असा होता.
आमच्या व्यवसायातील ग्राहक डॉ. पीटर न्यूटन यांच्या मालकीची महिंद्रा स्कॉर्पिओ कार क्रमांक MH 02 AY 2815 ही गेल्या तीन वर्षांपासून त्यांच्या संमतीने आमच्या ताब्यात होती. सदर वाहनाचा वापर आम्ही कुटुंबीय करत होतो.
आमच्या व्यवसायाच्या निमित्ताने ग्राहक असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे हे माझ्या पतीच्या ओळखीचे होते. त्यांना माझ्या पतीने नोव्हेंबर २०२० मध्ये हीच स्कॉर्पिओ कार वापरण्यासाठी दिली होती. ही कार सचिन वाझेंनी ५ फेब्रुवारी २०२१ रोजी माझ्या पतीच्या दुकानावर आणून दिली. त्यावेळी त्या कारचे स्टेअरिंग हार्ड वाटत आहे असं त्यांनी सांगितलं होतं.
माझे पती १७ फेब्रुवारीला संध्याकाळी ६.३० च्या सुमारास ठाणे येथील दुकानातून व्यवसायाच्या निमित्ताने मुंबईला जाण्यास निघाले. मुलुंड टोलनाका क्रॉस करून पुढे गेल्यानंतर कार स्टेअरिंग जाम झाल्याने त्यांनी गाडी रस्त्याच्या बाजूला पार्क केली व ओला/उबर कारने मुंबईला गेले.
१८ फेब्रुवारीला माझे पती आमच्या दुकानातील नोकराला सोबत घेऊन ज्या ठिकाणी कार पार्क केली होती तिथे गेले, दुरूस्तीसाठी कार आणायची असं त्यांनी ठरवलं होतं. मात्र तिथे गेले असता त्यांना त्या ठिकाणी कार सापडली नाही. ही बाब त्यांनी मला त्याच दिवशी सांगितली. एवढंच नाही तर यासंदर्भात विक्रोळी पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली. हेदेखील त्यांनी मला सांगितलं होतं.
२५ फेब्रुवारी २०२१ ला प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एक स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार बेवारस स्थितीत सापडल्याची बातमी मला टीव्हीद्वारे समजली. मात्र या कारचा क्रमांक वेगळा होता त्यामुळे ही आपलीच कार आहे हे मला त्यावेळी माहित नव्हते.
२५ फेब्रुवारीच्या रात्री दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक साळवी यांनी माझ्या पतीस फोन केला आणि बिल्डिंगच्या खाली बोलावलं. त्यावेळी माझे पती व माझा मुलगा असे दोघेही त्यांना बिल्डिंगखाली जाऊन भेटले.
त्यावेळी त्यांनी माझ्या पतीला त्यांच्या मोबाईलमध्ये असलेला स्कॉर्पिओ कारचा फोटो दाखवला. सदर फोटोवारून ही कार आमचीच आहे पण चोरीला गेली आहे असं माझ्या पतीने सांगितले. विक्रोळी पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीची कॉपीही त्यांनी दाखवला.
मनसुख हिरेन यांच्या पोस्ट मार्टम रिपोर्टमधून नवी माहिती समोर
त्यानंतर त्याच रात्री घाटकोपरचे पोलीस व दशतवाद विरोधी दलाचे पथकाचे पोलीस अधिकारी शिवाजी चव्हाण हे आले होते. ते माझ्या पतीला कारसंदर्भातल्या सखोल चौकशीसाठी दहशतवाद विरोधी पथक, विक्रोळी युनिट या ठिकाणी घेऊन गेले. सीसीटीव्ही फुटेजसंदर्भात तपास करून त्यांना परत सकाळी ६.३० च्या सुमारास घरी आणून सोडलं.
२६ फेब्रुवारी २०२१ सकाळी गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यासोबत माझे पती मुंबई गुन्हे शाखेत गेले होते. त्यानंतर रात्री १०.३० च्या सुमारास सचिन वाझे यांच्यासोबतच घरी आले.
दिवसभर मी सचिन वाझेंसोबत होतो असं माझ्या पतीने मला सांगितलं. २७ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी माझे पती सचिन वाझेंसोबत मुंबई गुन्हे शाखाल या ठिकाणी गेले. तिथून रात्री १०.३० वाजता परत आले. २८ फेब्रुवारी रोजीजही माझे पती सचिन वाझेंसोबत गेले होते. तिथे त्यांचा जबाब नोंदवण्यात आला होता. त्या जबाबावर सचिन वाझे यांची सही आहे.
दिनांक १ मार्चला माझे पती मनसुख हिरेन यांना भायखळा पोलिसांकडून फोन आला त्यांनी त्यादिवशी चौकशीसाठी बोलावले असल्याचे त्यांनी मला सांगितले. मात्र त्यादिवशी माझे पती कुठेही गेले नाहीत तर घरीच होते.
२ मार्च रोजी माझे पती संध्याकाळी दुकानातून घरी आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की ते सचिन वाझेंसोबत मुंबईत गेले होते व त्यांच्या सांगण्यावरून अॅडव्होकेट गिरी यांच्याकडून वारंवार पोलिसांकडून व मीडियाकडून फोन येत असल्याने त्रास असल्याची लेखी तक्रार माननीय मुख्यमंत्री माननीय गृहमंत्री, मा. पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई व ठाणे यांच्या नावे तयार करून घेतली असल्याचे व त्यांना दिली असल्याचे मला सांगितले होते. सदर तक्रार अर्जाची प्रत मी हजर करत आहे.
मी माझे पती यांच्याकडे पोलिसांनी मारहाण केली का? काही त्रास दिला का? याबाबत चौकशी केली होती. मात्र त्यांनी कोणीही मारहाण केली नाही किंवा त्रास दिला नाही. परंतू चौकशी जबाब नोंद करण्याचे काम झाल्यानंतर परत वेगवेगल्या पोलिसांकडून फोन येतात म्हणून तक्रार अर्ज दिल्याचे त्यांनी सांगितले होते. घरामध्ये वावरत असताना ते कधीही दबावाखाली किंवा टेन्शनमध्ये असल्याचे दिसून आले नाही. नेहमी प्रमाणे ते व्यवस्थित होते.
३ मार्च रोजी माझे पती सकाळी नेहमीप्रमाणे दुकानामध्ये गेले होते व रात्री दुकान बंद करून रात्री ९ वाजता घरी परतले. त्यावेळी रात्री माझे पती यांनी मला सांगितले की सचिन वाझे मला सांगत आहेत की तू सदरच्या केसमध्ये अटक होते दोन-तीन दिवसांमध्ये मी तुला जामिनावर बाहेर काढतो मी त्यावेळी माझे पती मनसुख यांना सांगितलं होतं की तुम्ही अटक होण्याची गरज नाही. आपण कोणाकडे सल्लामसलत करून निर्णय गेऊ. त्यावेळी ते थोडे टेन्शनमध्ये वाटत होते.
४ मार्च रोजी माझे पती मनसुख यांनी सकाळी माझ्या मोबाईलवरून दीर विनोद हिरेन यांची पत्नी सुनिता यांच्या फोनवर फोन करून कदाचित मला अटक होईल तू माझ्यासाठी चांगल्या वकिलाशी माझ्या अटकपूर्व जामिनासाठी बोलून ठेव असे सांगून दुकानात गेले होते. त्यानंतर ६ मार्चला माझे दीर विनोद हिरेन यांनी माझ्या पतीच्या निधनानंतर मला सांगितले होते की ४ मार्चला त्यांनी वकिलांशी बोलणी केली होती.
वकिलाने सल्ला दिला होता की आपण गुन्हेगार नसल्याने अटकपूर्व जामिनाची आवश्यकता नाही. आपण जरी अर्ज केला तरीही कोर्ट तो स्वीकारणार नाही. ती बाब त्याच दिवशी माझे पती यांना त्यांनी फोनवर सांगितली होती. ४ मार्चला माझा मुलगा माझे पती मनसुख हिरेन यांच्यासाठी जेवणाचा डबा घेऊन गेला होता. रात्री ८.३० वाजता माझे पती मनसुख यांचे मला माझ्या फोनवर मिस कॉल आले होते.
मी त्यांना फोन केला असता ते लिफ्ट मधून घरी येत होते. मी त्यांना एवढ्या लवकर घरी कसे आहाल असे विचारले असता ते म्हणाले की मला बाहेर जायचं आहे. मी त्यांना विचारलं की एवढ्या रात्री कुठे जायचं आहे? तसंच एकटेच का जात आहात? त्यावर त्यांनी मला सांगितलं की आपलेच पोलीस आहेत त्यांचा सल्ला घेण्यासाठी मी घोडबंदर येथे जात आहे. त्यानंतर त्यांनी मोटर सायकलची चावी माझ्याकडे दिली असता मी त्यांना विचारले की तुम्ही कसे जाणार? त्यावर त्यांनी आपण रिक्षाने जाणार असल्याचे सांगितले.
त्यानंतर ते निघून गेले. त्यानंतर माझा मुलगा ९.३० च्या सुमारास घरी आला व त्याने मला विचारले की डॅडी अजून घरी आले नाहीत का? मी त्याला सांगितलं की ते कांदिवली येथील पोलीस अधिकारी तावडे यांच्याशी सल्लामसलत करण्यासाठी घोडबंदर येथे गेले आहेत.
त्यावेळी माझ्या मुलाने मला सांगितले की तो जेवणाचा डबा घेऊन जेव्हा दुकानात गेलो होता व जेवण झाल्यावर परत येण्यास निघाला तेव्हा माझे पती मनसुख यांनी दुकानातील नोकर आझीम शेख आणि मुलगा मीत याला परत दुकानात बोलावलं. त्यावेळी मुलगा दुकानात गेला असता माझे पती मनसुख हे कुणाशी तरी फोनवर बोलत होते.
फोनवरचे बोलणे झाल्यावर त्यांनी माझ्या मुलाला तू दुकानात बस मला पोलीस अधिकारी तावडे यांचा फोन आला आहे त्यांना घोडबंदरला जाऊन भेटतो असे सांगितले होते. त्यानंतर मी माझ्या पतीची रात्री ११ वाजेपर्यंत वाट पाहिली. ते घरी आले नाहीत म्हणून त्यांना त्यांच्या मोबाईलवर फोन केला. मात्र त्यांचा फोन स्विच ऑफ येत होता.
दोन्ही क्रमांकावर फोन लागत नव्हता म्हणून मी Whats App कॉलही केले. पण तरीही त्यांच्याशी काहीही संपर्क झाला नाही. माझे पती मनसुख हे फोन कधीही बंद करत नसत. त्यामुळे मला त्यांची चिंता वाटू लागली. माझा मुलगा मीत आणि माझे दीर विनोद हिरन यांना मी ५ मार्चच्या मध्यरात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारा फोन करून सगळी हकीकत सांगितली.
कोण होते मनसुख हिरेन?? त्या दिवशी काय घडलं, जाणून घ्या घटनाक्रम
त्यानंतर माझ्या मुलाने त्यांना कोणी पोलीस अधिकारी यांचा फोन आपल्याकडे असेल तर चौकशी करा असे सांगितले. त्यांनी सचिन वाझे यांचा नंबर माझ्या पतीने त्यांना पठवला असल्याचं सांगितलं. विनोद यांनी मी यासंदर्भात सचिन वाझेंकडे चौकशी करतो असेही माझ्या मुलाला सांगितलं.
माझे दीर विनोद यांनी सचिन वाझेंना फोन केला होता. त्यावेळी सचिन वाझे यांनी मनसुख हे कधीही मला विचारल्याशिवाय कुठेच जात नाहीत आज कसे काय गेले अशी विचारणा केल्याचे सांगितले. तसंच आपण रात्रभर वाट पाहू अन्यथा सकाळी जाऊन पोलीस ठाण्यात तक्रार देऊ असंही माझे दीर विनोद यांनी सांगितलं
५ मार्चला सकाळी माझा मुलगा मीत आणि दीर विनोद हिरेन आम्ही नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले. त्यानंतर मी वारंवार फोन करून माझे पतीबाबत विचारणा करत होते. दुपारी ३.३० च्या सुमारास माझा मुलगा मीत याने मला फोन करून सांगितले की मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा पोलीस ठाणे येथे मिळाला आहे.
त्यानंतर माझा मुलगा मीत व माझे मोठे दीर विनोद हे मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी कळवा हॉस्पिटल या ठिकाणी गेले होते. रात्री ११ च्या सुमारास माझे दीर परत आले व त्यांनी सांगितले की माझे पती मनसुख हिरेन यांचा मृतदेह पोलिसांना मुंब्रा खाडी भागात मिळाला.
त्यांच्या तोंडावर स्कार्फ व स्कार्फच्या आतमध्ये ५ ते ६ घडी केलेले रुमाल मिळून आले. माझे पती उत्कृष्ट स्वीमर होते. ते पाण्यात बुडून मरूच शकत नाहीत. तसंच माझे पती घरातून निघाले तेव्हा त्यांच्या तोंडावर पायोनिअर कंपनीचा काळ्या रंगाचा आणि कानामध्ये अडकवता येईल असा मास्क होता.
माझे पती मनसुख हिरेन यांच्याकडे नमूद वर्णनाचा मोबाईल, गळ्यात दीड तोळ्याची सोन्याची चेन, हाताच्या बोटात सोन्याची अंगठी, टायटन कंपनीचे काळ्या व ब्राऊन रंगाचे घड्याळ, मनी पर्स, त्यामध्ये पाच ते सहा एटीएम आणि क्रेडिट कार्ड्स व रोख रक्कम होती.
ज्यावेळी त्यांचा मृतदेह मिळाला त्यावेळी मृतदेहांवर वरीलपैकी कोणतीही वस्तू आढळून आली नाही. वरील एकंदर परिस्थितीवरून माझ्या पतीचा खून झाला असावा अशी माझी खात्री आहे. सदरचा खून सचिन वाझे यांनी केला असावा असा मला संशय आहे म्हणून सदर घटनेबाबत सखोल चौकशी होऊन कायदेशीर कारवाई व्हावी अशी विनंती आहे.
ADVERTISEMENT