–अनिकेत जाधव, लातूर
ADVERTISEMENT
लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे आजपासून साहित्यिकांचा मेळा रंगणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होत असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन होत आहे.
95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून उदगीर इथं सुरूवात होतं आहे. २२, २३ आणि २४ एप्रिल असं तीन दिवस हे साहित्य संमेलन भरणार आहे.
उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या मैदानावर या संमेलनाची जय्यत तयारी करण्यात आली असून, साहित्य संमेलन परिसराला गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं नाव देण्यात आलं आहे.
महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या ३६ एकर जागेवर संमेलनासाठी वेगवेगळी ७ व्यासपीठं उभारण्यात आली आहेत. राज्यासह देशभरातील साहित्यकांना संमेलनासाठी निमंत्रित करण्यात आलेलं असून, एकाच वेळी एका सभागृहात हजारो लोक बसू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेऊन मंडप वातानुकूलित उभारण्यात आले आहेत. राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते या संमेलनाचे उदघाटन होत असून, समारोप कार्यक्रमाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद ,राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थित असणार आहे.
संमेलनाचे स्वागताध्यक्ष राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी ही दिली आहे.
उदगीर शहरात येणाऱ्या साहित्यिकांच्या स्वागतासाठी मुख्य रस्त्यांवर कमानी आणि बॅनर्स लावण्यात आले आहेत. साहित्य रसिकांसाठी विविध सत्रात कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे.
साहित्याबरोबरच संगीताचेही कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. कार्यक्रमास येणाऱ्या प्रमुख पाहुण्यांच्या सोयीसाठी निवास आणि भोजन व्यवस्थाही करण्यात आली आहे.
संमेलनस्थळी एकाच वेळी १० हजार लोक जेवण करू शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. उदगीर शहराच्या आजूबाजूला हेलिकॉप्टर उतरण्यासाठी ७ हेलिपॅड बनविण्यात आले आहेत.
सारस्वतांच्या स्वागतासाठी ऐतिहासिक नगरी उदगीर सज्ज झाली असून, येथील लोकांमध्ये साहित्य संमेलनामुळे उत्साहाचं वातावरण दिसत आहे.
ADVERTISEMENT