मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी हायकोर्टात जी याचिका दाखल केली होती त्या याचिकेवर सुनावणी करताना बॉम्बे हायकोर्टाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. १०० कोटींच्या वसुलीचे गृहमंत्र्यांवर झालेले आरोप हे गंभीर आहेत असं कोर्टाने म्हटलं आहे. या निर्णयानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला व ते दिल्लीला रवाना झाले.
ADVERTISEMENT
अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची चर्चा जेवढी रंगली आहे तेवढीच चर्चा आणखी एका नावाची रंगते आहे ते नाव आहे दिलीप वळसे पाटील. महाराष्ट्राच्या गृहमंत्रीपदाची धुरा आता राष्ट्रवादी काँग्रेस दिलीप वळसे पाटील यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. आपण जाणून घेऊयात कोण आहेत दिलीप वळसे पाटील.
राज्याचे नवे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, पाहा नवे खातेबदल; कोणाकडे कोणतं खातं?
कोण आहेत दिलीप वळसे पाटील?
दिलीप वळसे पाटील हे शांत स्वभावाचे पण मुरब्बी राजकारणी मानले जातात. ते जेव्हा विधानसभा अध्यक्ष होते तेव्हा त्यांचा उल्लेख हेडमास्तर असा केला जात असे. काटेकोर शिस्त पाळणारे आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांचा लौकिक आहे. माजी काँग्रेस आमदार आणि शरद पवारांचे जवळचे मित्र दत्तात्रय पाटील यांचे ते पुत्र. शरद पवारांचे स्वीय सचिव म्हणून त्यांनी काम सुरू केलं.
१९९० मध्ये त्यांनी पहिल्यांदा आंबेगाव मतदार संघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली. ही निवडणूक ते जिंकले त्यानंतर ते आजपर्यंत ते या मतदारसंघातून जिंकत आले आहेत.
१९९९ मध्ये दिलीप वळसे पाटील हे शरद पवारांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेले. त्यानंतर ते विलासराव देशमुखांच्या मंत्रिमंडळात मंत्रीही झाले. त्यावेळी त्यांच्याकडे उर्जा खातं आणि वैद्यकीय शिक्षण या दोन खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
त्यानंतर दिलीप वळसे पाटील यांच्याकडे अर्थ खातंही सोपवण्यात आलं होतं ही जबाबदारीही त्यांनी समर्थपणे सांभाळली.
२००९ ते २०१४ या कालावधीत दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले.
ADVERTISEMENT