अमरावती : भाजपचे समर्थक आमदार रवी राणा विरुद्ध शिंदे गटाचे समर्थक आमदार बच्चू कडू हा वाद आता वरिष्ठांच्या कोर्टात पोहचला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रवी राणा यांच्यात आज बैठक पार पडली. यानंतर रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये सागर बंगल्यावर एक निर्णयक बैठक पार पडणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री सुद्धा उपस्थित राहू शकतात अशी शक्यता आहे.
ADVERTISEMENT
याबाबत बोलताना बच्चू कडू म्हणाले, रवी राणा यांनी जी बदनामी केली त्याचं आजच्या बैठकीत आमचं समाधान झालं नाही तर आम्ही राणाला फुटण्यासारखं फोडून काढू. तसंच एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहायचं की नाही याबाबत बैठकीत काय नेमकी चर्चा होते, ते बघून आम्ही निर्णय घेऊ. आमदारांनी पैसे घेतले नाही, हे काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. पण सत्तेतील आणि घरातील माणूस जेव्हा आरोप करतो तेव्हा नाराजीचा सूर असणारच आहे असेही कडू म्हणाले.
एक तारखेच्या अनुषंगाने महाराष्ट्रभरातील कार्यकर्ते अमरावती येथे येणे सुरू झालेले आहे. पुणे, सातारा, रत्नागिरी असे महाराष्ट्रातून कार्यकर्ते अमरावतीत येत आहेत. आज बैठकीत समाधान झालं तर आंदोलनाचं रूपांतर मेळाव्यात करु. पण समाधान नाही झालं तर त्याचं रुपांतर निषेध स्वरूपात करू. पण समाधानकारक निर्णय झाला तर नक्कीच कुठेतरी या वादावर पडदा पडू शकतो असेही आमदार कडू म्हणाले.
अपक्ष आमदारांचाही मला पाठिंबा आहे. कार्यकर्त्यांचे मत आहे की सरकार मधून बाहेर पडावं. आपला गेम होईल अशा पद्धतीचे संदेश कार्यकर्ते पाठवत आहे. पण या बैठकीत काय होणार त्यानंतर निर्णय घेऊ. कार्यकर्त्यांचे मन दुखलं आहे. कार्यकर्त्यांमध्ये भीतीच वातावरण आहे. आपल्या नेत्याचं गेम तर होणार नाही ना? त्यामुळे ते मेसेज करत आहे. उद्या कार्यकर्त्यांची- आमची बैठक आहे, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला.
पंधरा वर्षे सातत्याने विरोधात लढत आलो आहे. मतदारसंघातील महत्त्वाच्या मागण्या होत्या त्या अनुषंगाने महाविकास आघाडीमध्ये सामील झालो. ती आघाडी मध्येच तुटली, पण आता नवीन समीकरण जुळलं आहे, विकासाचा खेळ अर्धवट राहू नये म्हणू या नव्या समीकरणामध्ये सामील झालो. पण तीन महिन्यातील अनुभव राणाच्या माध्यमातून कडूच राहिला, असं म्हणत त्यांनी नाराज व्यक्त केली. तसंच एक तारखेला ट्रेलर होईलच त्यावरून पुढील पिक्चर सगळ्यांच्या लक्षात येईल. कोर्टाची ही प्रक्रिया कोर्ट बंद असल्याने थांबली आहे, पण उघडल्यावर पहिली केस आपलीच राहील असेही कडू यांनी मिश्किलपणे सांगितलं.
ADVERTISEMENT