गोव्यात ‘मगो’चे ढवळीकर ठरणार किंगमेकर, सत्तास्थापनेसाठी काँग्रेस-भाजपकडून मनधरणीला सुरुवात

मुंबई तक

• 04:06 AM • 10 Mar 2022

गोवा विधानसभा निवडणुकांमध्ये सुरुवातीचे कल हाती यायला सुरुवात झाली आहे. एक्झिट पोलने दिलेल्या आकडेवारीनुसार गोव्यात काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांना पूर्ण बहुमत मिळेल अशी चिन्ह दिसत नाहीयेत. अशा परिस्थितीत अपक्ष आणि महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाच्या भूमिकेवर गोव्यात कोणाची सत्ता येणार हे निश्चीत होईल असं चित्र दिसत आहे. अशातच मगो पक्षाच्या सुदीन ढवळीकर यांना आपल्याकडे खेचून […]

Mumbaitak
follow google news

गोवा विधानसभा निवडणुकांमध्ये सुरुवातीचे कल हाती यायला सुरुवात झाली आहे. एक्झिट पोलने दिलेल्या आकडेवारीनुसार गोव्यात काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांना पूर्ण बहुमत मिळेल अशी चिन्ह दिसत नाहीयेत. अशा परिस्थितीत अपक्ष आणि महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाच्या भूमिकेवर गोव्यात कोणाची सत्ता येणार हे निश्चीत होईल असं चित्र दिसत आहे. अशातच मगो पक्षाच्या सुदीन ढवळीकर यांना आपल्याकडे खेचून घेण्यासाठी काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष प्रयत्न करत असल्याचं कळतंय.

हे वाचलं का?

राज्यात त्रिशंकु परिस्थिती निर्माण झाल्यास दोन्ही पक्षांनी मगोला आपल्यासोबत घेण्याची तयारी केली आहे. अशा परिस्थितीत सुदीन ढवळीकर अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाच्या बोलीवर सत्तास्थापनेसाठी बोलणी करु शकतात असं मत राजकीय जाणकारांनी व्यक्त केलं आहे.

काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी.चिदंबरम यांनी मंगळवारी सुदीन ढवळीकर यांची भेट घेतली. भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचं असेल तर इतर पक्षांनी एकत्र येणं गरजेचं असल्याची चर्चा या बैठकीत झाली. ज्याला सुदीन ढवळीकरांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं कळतंय. महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाने यंदा तृणमुल काँग्रेसशी युती करत निवडणुक लढवली आहे. त्यामुळे कोणत्या पक्षाला पाठींबा देण्याचा हा निर्णय तृणमुलशी चर्चा करुन घेतली जाईल असं ढवळीकर यांनी पी.चिदंबरम यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर बोलताना सांगितलं. एक्झिट पोलमध्ये मगोला 6 ते 9 आणि तृणमुल काँग्रेसला 3 ते 4 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. असं झाल्यास सत्तास्थापनेत मगोपक्षाची भूमिका महत्वाची असणार आहे.

सुदीन आणि दीपक ढवळीकर बंधू यंदा भाजपसोबत जाणार नाही अशी खात्री काँग्रेस नेत्यांना असल्यामुळे त्यांनी ढवळीकर बंधूंसोबत बैठका घ्यायला सुरुवात केली आहे. दुसरीकडे भाजपच्या केंद्रीय नेत्यांनीही ढवळीकर यांची मनधरणी सुरु केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, निकालाचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर भाजपचं केंद्रीय नेतृत्व नितीन गडकरींना गोव्यात पाठवू शकतं. नितीन गडकरी आणि सुदीन ढवळीकर यांची चांगली ओळख असल्यामुळे भाजपला आशा आहे.

Goa Election Counting: विश्वजीत राणे आमचेच, गरज पडली तर आमदार फोडून आणतील – भाजपचा दावा

सुदीन ढवळीकरांनी काही दिवसांपूर्वी बोलताना गोव्यात प्रमोद सावंत यांना पुन्हा मुख्यमंत्री होऊ देणार नाही अशी जाहीर भूमिका घेतली होती. त्यामुळे राज्यात त्रिशंकु परिस्थिती निर्माण झाल्यास मगो पक्ष अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदासाठी वाटाघाटी करेल असा अंदाज स्थानिक राजकीय जाणकार आणि नेत्यांनी व्यक्त केला आहे. मगो पक्षाने तीन पेक्षा जास्त जागा जिंकल्यास केंद्रातील भाजप नेतृत्वाचा विचार करुन ढवळीकर बंधू तृणमुल काँग्रेससोबतची युती तोडत भाजपसोबत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पक्षाने साथ दिली नसल्याची खंत, भाजपला क्लिन स्विपची संधी होती पण… – लक्ष्मीकांत पार्सेकर

    follow whatsapp