शेतकऱ्यांचं आंदोलन भारतात सुरू असलं तरी त्याच्यावरून आता जगभरात पडसाद उमटू लागलेत. जगप्रसिद्ध पॉप सिंगर रिहानाने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर आता कधीकाळची पॉर्नस्टार राहिलेल्या मिया खलिफानंही शेतकऱ्यांना पाठबळ दिलंय.
ADVERTISEMENT
मिया खलिफानं शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत एक ट्विट केलंय. ती आपल्या ट्विटमध्ये लिहिते, ‘हे सरळ सरळ मानवाधिकारांचं उल्लंघन आहे. या लोकांनी दिल्लीत इंटरनेट कनेक्शन तोडलंय.’
या ट्विटनंतर मिया खलिफानं आणखी एक ट्विट केलंय. याट्विटमध्ये तिने इशाऱ्यातूनच अनेकांवर निशाणा साधलाय. या ट्विटमध्ये ती लिहिते, ‘पुरस्कार वितरणामध्ये पैसे देऊन आणलेल्या कलाकारांकडे कानाडोळा केला जाणार नाही, अशी अपेक्षा आहे. मी शेतकऱ्यांसोबत उभी आहे.’
मिया खलिफाने ट्विटरसोबतच इन्स्टाग्रामवरही शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत काही फोटो शेअर केलेत. मिया खलिफाच्या या पाठिंब्यानंतर काही जणांनी तिला ट्रोल करायलाही सुरवात केलीय. नावावरून ती पाकिस्तानी असल्याचंही काहीजण म्हणत आहेत. पण वास्तव असं नाही. मग भारतातल्या शेतकऱ्यांना पाठिंबा देणारी मिया खलिफा कोण आहे.
कोण आहे मिया खलिफा?
मिया खलिफाचा जन्म १० फेब्रुवारी १९९३ ला लेबनॉनमध्ये झाला. नंतर ती अमेरिकेत राहायला गेली. वयाच्या २१ व्या वर्षीच तिने पॉर्न इंडस्ट्रीत स्वतःचा नावलौकिक तयार केला होता.
तिच्या पॉर्न इंडस्ट्रीतल्या एंट्रीबद्दलही एक गोष्ट सांगितली जाते. रेस्टोरंटमध्ये कामाला असलेल्या मिया खलिफाला एका ग्राहकानं पॉर्न इंटस्ट्रीत काम करावं म्हणून कॉन्टॅक्ट केला होता. पण आता मिया खलिफा पॉर्न इंडस्ट्रीमध्ये काम करत नाही.
तिने ५ वर्षांपूर्वीच काळापूर्वीच पॉर्न इंडस्ट्रीतून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला. यानंतर नोकरीधंदा शोधताना आपल्याला खूप अडचणी आल्याचंही तिनं सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं होतं.
गुगलवर मिया खलिफा असं नाव शोधलं की तिच्या नावासोबत पॉर्न स्टार हा शब्दही जोडला जातो. पण मियाला आपल्या नावासोबत जोडला जाणारा हा शब्द आता नकोसा वाटतोय. विकिपीडियावरूनही स्वतःच्या नावासोबत येणारा पॉर्नस्टार शब्द हटवण्यासाठी तिने प्रयत्न केला. पण कंपनीकडून चांगला प्रतिसाद मिळाला नसल्याचं तिनं बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं.
२८ वर्षांची मिया खलिफा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिने टाकलेल्या पोस्टवर तिला चाहत्यांकडूनही तुफान प्रतिसाद मिळतो. सोशल मीडियावरच्या तिच्या तगड्या फॅन फॉलोईंगमुळे तिच्या अनेक पोस्ट वाऱ्याच्या वेगानं व्हायरलही होतात.
ADVERTISEMENT