दक्षिण आफ्रिकेत झपाट्याने पसरत असलेल्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने भारतात चंचुप्रवेश केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. परदेशातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांची काटेकोरपणे तपासण्या केल्या जात आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत दाखल झालेल्या प्रवाशांपैकी 30 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. दरम्यान, अंबरनाथ येथे रशियातून परतलेल्या 7 वर्षाच्या मुलीचा कोरोनाचं निदान झालं आहे.
ADVERTISEMENT
दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंट आढळून आल्यानंतर केंद्र सरकारने जोखमीच्या (हाय रिस्क) देशांची यादी तयार केली आहे. या देशांबरोबरच इतर देशांतून येणाऱ्या प्रवाशांचीही विमानतळावर तपासणी केली जात असून, क्वारंटाईन आणि होम क्वारंटाईन सक्तीचं करण्यात आलं आहे. नव्या व्हेरिएंट आढळून आल्यानंतर अंबरनाथमध्ये रशियातून आलेल्या कुटुंबातील एका 7 वर्षाच्या मुलीला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं आहे. मात्र, तिला ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झाला की नाही, हे अद्याप स्पष्ट व्हायचं आहे.
Omicron Variant : कोरोना होऊन गेलेल्यांनाही ओमिक्रॉनचा संसर्ग होऊ शकतो?
मुलगी आपल्या आई-वडिलांसोबत रशियात फिरण्यासाठी गेली होती. 28 नोव्हेंबरला संपूर्ण कुटुंब राशियाहून अंबरनाथला परत आलं. त्यानंतर काही दिवसांत मुलीला त्रास होऊ लागल्यानं टेस्ट केली असता, ती कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. सध्या कुटुंबातील सर्व सदस्यांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. तर पॉझिटिव्ह मुलीचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत.
दिलासादायक बाब म्हणजे मुलीच्या वडिलांचा कोरोना अहवाल हा निगेटिव्ह आला असून, आईच्या अहवालाची अजून प्रतीक्षा आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेकडून हे कुटूंब राहत असलेली इमारत सील केली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
Omicron चा प्रसार मुंबईत होऊ न देण्यासाठी BMC सज्ज, वॉर रुम अधिकाऱ्यांकडे मोठी जबाबदारी
भारतात तिसरा रुग्ण आढळला…
भारतात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन (Omicron) चा आणखी एक रुग्ण आता आढळून आला आहे. गुजरातमधील जामनगरमध्ये हा रुग्ण सापडला असल्याचं समजतं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ओमिक्रॉन व्हेरिएंटने पॉझिटिव्ह असलेला हा रुग्ण काही दिवसांपूर्वीच आफ्रिकन देश झिम्बाब्वेमधून गुजरातमधील जामनगरमध्ये परतला होता. त्यामुळे आता गुजरातमधील प्रशासन खडबडून जागं झालं आहे.
ADVERTISEMENT