अमरावतीच्या बडनेऱ्याचे आमदार रवी राणा यांना दिलासा मिळाला आहे. नवी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने रवी राणा यांना ट्रान्झिट बेल मंजूर केला आहे. अमरावतीच्या राजापेठ येथील पोलीस ठाण्यात रवी राणांविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांमध्ये त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. कोर्टाने १ आठवड्याचा ट्रान्झिट बेल मंजूर केल्यामुळे या कालावधीत पोलिसांनी रवी राणा यांना अटक करता येणार नाहीये.
ADVERTISEMENT
दरम्यानच्या काळात रवी राणा पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याविरुद्ध उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाद मागणार आहेत. ऐकीव माहितीच्या आधारावर आणि राजकीय दबावातून पोलिसांनी आपल्यावर गुन्हा दाखल केल्याचं सांगत याविरुद्ध खंडपीठात आपण मानहानीचा दावाही दाखल करणार असल्याचं आमदार रवी राणा यांना सांगितलं.
अमरावतीच्या राजापेठ भागात रस्त्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी आलेले महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्यावर शाई फेकण्यात आली होती. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर महापालिकेने केलेल्या कारवाईविरुद्ध आयुक्तांवर ही शाई फेकण्यात आली होती. हल्ला करणाऱ्या महिला कार्यकर्त्या रवी राणांच्या संघटनेशी संबंधित असल्याचं समोर आलं होतं. ज्यानंतर राजापेठ पोलिसांनी ११ जणांवर गुन्हा दाखल केला होता ज्यात रवी राणांचाही समावेश होता. आतापर्यंत या प्रकऱणात ५ आरोपींना अटक करण्यात आली असून पोलीस रवी राणांनाही अटक करण्याच्या तयारीत होते. त्याआधीच रवी राणांनी ट्रान्झिट बेल मिळवला आहे.
ADVERTISEMENT