एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीच्या सुरुवातीला उद्धव ठाकरे यांच्यासोबत खंबीरपणे सोबत असलेले आणि अचानक शिंदे गटात गेलेले कळमनुरीचे आमदार सध्या चर्चेत आहेत. त्यांच्याविषयी रोज एक बातमी समोर येत आहे. आत्ता देखील एक कथित व्हिडीओ क्लिप समोर आली आहे, ज्यामध्ये बांगर समर्थक धक्कादायक गौप्यस्फोट करताना ऐकायला मिळत आहे. बांगर यांचा समर्थक या कथित क्लिपमध्ये म्हणतो की, आमदार बांगर यांना उद्धव ठाकरे यांचा गट सोडायला 100 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. ही क्लिप सध्या समाजमाध्यमात मोठ्याप्रमाणात वायरल होत आहे.
ADVERTISEMENT
संतोष बांगर यांच्याविषयीच्या क्लिपमध्ये काय आहे?
विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये स्वतः आमदार संतोष बांगर हे देखील दिसत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीपासून त्यांच्या गटातील आमदारांचे कथित कॉल रेकॉर्डिंग वायरल होत आहेत. ज्यामध्ये शिंदे गटात जाण्यासाठी 50 कोटी दिल्याचे कथित आरोप देखील केल्याचे क्लिपमध्ये ऐकायला मिळतात. नुकतंच संतोष बांगर यांची देखील एक कथित कॉल रेकॉर्डिंग वायरल झाली, ज्यामध्ये पन्नास कोटींचा उल्लेख करण्यात आला आणि आता त्यानंतर शिंदे गटात जाण्यापूर्वीचा एक व्हिडीओ ज्यात त्यांचा समर्थक भाषण करतोय, असा व्हिडीओ समोर आला आहे.
मागच्या काही दिवसांपासून शिवसेना नेते संतोष बांगर यांची चर्चा मोठ्याप्रमाणात सुरु आहे. त्याच कारण म्हणून एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर त्यांनी या बंडखोर आमदारांच्या विरोधात मोर्चा खोलला होता. उद्धव ठाकरे यांची साथ सोडू नका, असं रडत आवाहन त्यांनी केलं होतं. सोबतच बंडखोर आमदारांच्या बायका त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही, अशी टीका देखील बांगर यांनी केली होती. मात्र अचानक फ्लोर टेस्टच्या दरम्यान त्यांनी शिंदे गटात उडी मारली आणि शिंदेंच्या बाजूने मतदान केले. त्यानंतर बांगर यांच्यावर मोठ्याप्रमाणात शिवसैनिकांकडून टीका झाली.
गद्दार म्हणून त्यांना संबोधलं जाऊ लागलं. या टीकेला उत्तर देत बांगर यांनी आपल्याला गद्दार म्हणणाऱ्यांची कानशिलात लावा, असा वादग्रस्त विधान त्यांनी केला. या वक्त्यव्याला प्रतित्युर देत शिवसेनेच्या एका महिला पदाधिकाऱ्यानि माझ्या कानशिलात लावूनच दाखवा, असे आव्हान त्यांना दिले होते. हे प्रकरण संपत नाही तोपर्यंत आता बांगर यांच्या संदर्भातली कथित व्हिडीओ क्लिप समोर आली आहे. सोशल मीडियावर जी वायरल होतीय.
तीस सेकंदाचा हा व्हिडीओ क्लिप आहे. ज्यामध्ये स्वतः आमदार बांगर उभे आहेत आणि माईकवर एक कार्यकर्ता भाषण करतोय तो असा, “बांगर साहेबांना एक फोन आला, बांगर साहेबांनी तो फोन मला ऐकवला. एवढंच नाही 50 कोटीपासून आकडा जो सुरु झाला मित्रांनो, आजचा सकाळचा आकडा जो होता, आमदार साहेबांना सांगितलं होतं की, मी तुम्हाला शंभर कोटी रुपये देतो आणि तुम्ही माझ्यासोबत या. पण आमदार साहेबांनी सांगितलं, मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे आणि उद्धव ठाकरेंसोबतच राहणार. शंभर कोटींना धुडकावणारा एक प्रामाणिक शिवसैनिक” असं या कथित क्लिपमध्ये ऐकायला मिळतंय. या व्हिडीओ क्लिपचे पृष्ठी आम्ही करत नाहीत. मात्र आता या वायरल व्हिडीओ क्लिपनंतर आमदार संतोष बांगर काय प्रतिक्रिया देतात, हे महत्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT