मनसेचे नेते राज ठाकरे आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे दोघेही चुलत भाऊ आहेत. मात्र राजकारणात ते एकमेकांवर टीका करत असताना दिसतात. शिवसेनेत मोठी फूट एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर पडली आहे. अशात आदित्य ठाकरे यांच्या एका वक्तव्याचा संदर्भ देऊन अमेय खोपकर यांनी टीका केली आहे.
ADVERTISEMENT
काय म्हणाले आहेत मनसेचे नेते अमेय खोपकर (Amey Khopkar)?
नियतीचा खेळ! महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला “संपलेला पक्ष” म्हणून हिणवलेले आदित्य ठाकरे आज “पक्ष नसलेला” माणूस झाले आणि चिन्ह देखील गमावण्याची वेळ आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील चेष्टेचा विषय बनले! म्हणून एखाद्याच्या वाईट काळात कधीच कुणाला हिणवू नये! #शिल्लकसेना. हे ट्विट करून अमेय खोपकर यांनी टीका केली आहे.
२१ जूनला एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं. त्यांच्यासोबत शिवसेनेचे ४० आमदारही गेले आहेत. त्यानंतर राज्यात सत्तांतर झालं. मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरे यांना सोडावं लागलं. त्यानंतर एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. भाजपच्या साथीने ४० आमदारांच्या गटाने वेगळं जात सत्ता स्थापन केली. त्यानंतर शिवसेनेत फाटाफूट झालेली पाहण्यास मिळते आहे. ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली येथील माजी नगरसेवकही शिंदे गटाला जाऊन मिळाले आहेत. उद्धव ठाकरेंकडे धनुष्यबाण हे चिन्हही कदाचित राहणार नाही अशा चर्चा रंगल्या आहेत. अशात आता मनसेने हा खोचक टोला लगावला आहे.
संपलेल्या पक्षांना महत्त्व देत नाही, आदित्य ठाकरेंचा राज ठाकरेंना खोचक टोला
एप्रिल महिन्यात राज ठाकरे यांनी मशिदींवरच्या भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी त्यांचं भाषण त्यांनी घेतलेल्या सभा हे सगळंच गाजलं होतं. राज ठाकरे यांनी भोंगे बंद झाले पाहिजेत नाहीतर मनसे ज्या धार्मिक स्थळांवर भोंगे वाजतील त्यासमोर मनसे हनुमान चालीसा म्हणणार असं म्हटले होते. शिवसेना भवनासमोरही हनुमान चालीसा म्हणण्याचा प्रयत्न झाला होता. या सगळ्याबाबत तेव्हा आदित्य ठाकरे यांना विचारलं गेलं होतं तेव्हा संपलेल्या पक्षांबद्दल मी बोलत नाही असं म्हणत त्यांनी मनसेला आणि राज ठाकरेंना टोला लगावला होता.
अमेय खोपकर यांनी आज ट्विट करत असताना नेमका हाच संदर्भ घेतला आहे. तसंच संपलेला पक्ष” म्हणून हिणवलेले आदित्य ठाकरे आज “पक्ष नसलेला” माणूस झाले आणि चिन्ह देखील गमावण्याची वेळ आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील चेष्टेचा विषय बनले आहेत असंही म्हटलं आहे.
ADVERTISEMENT