मंगळवारी शिवसेनेने नारायण राणेंच्या विरोधात राज्यभरात आंदोलन केलं. नारायण राणे विरूद्ध शिवसेना असा ‘सामना’ मंगळवारी महाराष्ट्राने पाहिला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्या वक्तव्याचे पडसाद राज्यभरात उमटलेले पाहण्यास मिळाले. शिवसेना विरूद्ध भाजप असा सामना झाल्यानंतर आता मनसेचे नेते संदीप देशपांडे सत्ताधारी शिवसेनेच्याविरोधात उपहासात्माक ट्विट केलं आहे.
ADVERTISEMENT
मनसेने शिवसेनेच्या आंदोलनामुळे महाराष्ट्राला झालेले फायदे काय आहेत ते सांगितलं आहे
मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी खोचक ट्विट करत शिवसैनिकांच्या राड्यामुळे महाराष्ट्राला झालेल्या फायदे झाले आहेत ती यादी.
डेल्टा, डेल्टा प्लस असं काही नसतं
घरचंच आंदोलन होतं त्यामुळे आपल्यावर खापर फुटू नये म्हणून तिसऱ्या लाटेला सुट्टी
सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा पत्रकार विसरले
आता आपण कोरोनाच्या कानात आत्मविश्वासाने सांगू शकतो तू संपलास
असं खोचक ट्विट मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केलं आहे.
काय म्हणाले नारायण राणे?
‘मी असं म्हटलं होतं की स्वातंत्र्य दिनी जर त्यांना हे माहित नाही की देशाचा हिरक महोत्सव आहे की अमृत महोत्सव आहे तर त्यादिवशी जर मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असती. राष्ट्राला जे स्वातंत्र्य मिळालं त्याला किती वर्षे झाली हे मुख्यमंत्र्यांना माहिती नाही म्हणून मी हे वक्तव्य केलं होतं. आता बळाचा वापर करून मला अटक करण्यात आली आहे. जबरदस्ती अटक करण्यात आली आहे. काही कारण नसताना माझ्या जिवितास धोका निर्माण होईल असं वर्तन पोलीस करत आहेत. चार FIR माझ्याविरोधात दाखल करण्यात आल्या आहेत, 100 केल्या तरीही हरकत नाही. त्यांच्या हातात कायदा आहे.
मुख्यमंत्र्यांचा मुलगा जेव्हा सुशांत आणि दिशा सालियन मृत्यू प्रकरणात अडकला तेव्हा त्याला कसं वाचवलं? असाही प्रश्न नारायण राणेंनी विचारला. आता तुमच्या अटकेनंतर केंद्र आणि राज्य यांच्यात संघर्ष सुरू होईल का? असं विचारलं असता राणे म्हणाले, राज्य आमच्याशी संघर्ष करूच शकत नाही. माझी अटक असंवैधानिक आहे असंही नारायण राणे म्हणाले. कायद्याचा जो काही गैरवापर होतो आहे ते मी पाहतो आहे, जे कुणी यामध्ये गुंतले आहेत त्यांच्यावर मी कारवाई करणार आहे असंही राणेंनी मुंबई तकला सांगितलं आहे.
ADVERTISEMENT