शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांनीही मुंबईत बुधवारी दसरा मेळावे घेतले. दोन्ही गटाचे मेळावे दणक्यात झाले. शिवाजी पार्क आणि बीकेसी मैदान या ठिकाणी शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्क मैदानावरून जी टीका एकनाथ शिंदे आणि भाजपवर केली त्या टीकेला तोडीस तोड उत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलं. अशात आता उद्धव ठाकरेंच्या भाषणाबाबत मनसेची प्रतिक्रिया समोर आली आहे.
ADVERTISEMENT
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी नेमकं काय म्हटलं आहे?
नुसतीच “उणी”धुणी” “नळ”आणि”भांडण”विचार ही नाही आणि सोनंही नाही. असं वाक्य पोस्ट करत संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणावर टीका केली आहे. राजकारणात घराणेशाही मानता का? यावर उद्धव ठाकरेंनी एका मुलाखतीत दिलेलं उत्तरही संदीप देशपांडे यांनी ट्विट केलं आहे. तसंच भूतकाळ कधीच पिच्छा सोडत नसतो असंही त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे. या ट्विटमध्ये उद्धव ठाकरे हे घराणेशाही लादली जाऊ नये या आशयाचं वक्तव्य करताना दिसत आहेत. त्यावरून ही टीका संदीप देशपांडे यांनी केली आहे.
राहुल शेवाळे यांचा गंभीर आरोप
एकीकडे उद्धव ठाकरे यांचं भाषण सुरू असताना दुसरीकडे बीकेसी मैदानावर एकनाथ शिंदेंचाही दसरा मेळावा सुरू होता. एकनाथ शिंदे यांच्या गटातील खासदार राहुल शेवाळे यांनी राज ठाकरे शिवसेना सोडून बाहेर पडल्यानंतर त्यांच्या घरावर मोर्चा नेण्याचे आणि त्यांच्या विरोधात आंदोलन करण्याचं तसंच शिव्या देण्याचे आदेश मातोश्रीवरून आले होते असा आरोप केला. शिवसेना सोडून गेलेल्या छगन भुजबळ आणि नारायण राणेंबाबतही असाच प्रकार झाल्याचाही दावा राहुल शेवाळे यांनी केला.
गजानन काळे यांचंही ट्विट चर्चेत
उद्धव ठाकरे यांची सभा सुरू होण्यापूर्वी ही टोमणेसभा असणार आहे असा टोला मनसेचे प्रवक्ते गजनान काळे यांनी ट्विट करत लगावला होता. भाषण संपल्यानंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनीही टीका केली आहे.
शिवसेना दुभंगल्यानंतर पहिल्यांदाच शिवसेनेचे दोन दसरा मेळावे पार पडले. दोन दसरा मेळावे झाल्याचा ही पहिलीच वेळ असावी. अशात उद्धव ठाकरे यांनी जे आरोप केले त्या सगळ्या आरोपांना एकनाथ शिंदे यांनी सडेतोड उत्तरं दिली. बाळासाहेब ठाकरे यांची प्रॉपर्टी तुमच्या नावावर असेल पण आम्ही विचारांचा वारसा पुढे घेऊन चालणारे आहोत असं उत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. तसंच बाप चोरणारी टोळी असा जो उल्लेख उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाचा केला त्यालाही एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलं. आम्ही जर बाप चोरणारी टोळी असू तर तुम्ही बापाचे विचार विकणारी टोळी आहे असं म्हणायचं का? असं प्रत्युत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलं.
ADVERTISEMENT