कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करणारा महाराष्ट्र सध्या लॉकडाउनच्या उंबरठ्यावर येऊन उभा राहिला आहे. रविवारी टास्क फोर्सच्या झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला लॉकडाउनची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. आजही राज्यातील अनेक महत्वाच्या शहरांमध्ये रुग्णसंख्येत होत असलेली वाढ पाहता आरोग्य यंत्रणेवर ताण येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आजही राज्याने रुग्णवाढीचा नवा उच्चांक गाठला असून दिवसभरात ४० हजार ४१४ नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. शनिवारी राज्यातली रुग्णसंख्या ही ३५ हजार ७२६ इतकी होती.
ADVERTISEMENT
आज १०८ रुग्णांनी कोरोनाचा सामना करताना आपले प्राण गमावले असून सध्याच्या घडीला राज्यात ३ लाखांपेक्षा जास्त कोरोनाचे सक्रीय रुग्ण आहेत. दरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही गेल्या काही दिवसांमध्ये रुग्णसंख्येचा वाढीचा दर हा चिंताजनक असल्याचं सांगितलं. “सध्याच्या घडीला राज्यात दर दिवशी १० टक्क्यांनी रुग्णसंख्येत वाढ होते आहे. ही वाढ खरंच चिंताजनक आहे आणि पुढच्या काही दिवसांमध्ये ही वाढ अशीच राहिली तर आपल्याला रुग्णालयात बेड कमी पडतील की काय अशी शंका निर्माण झाली आहे. याचसोबत जर कोरोनाचा स्ट्रेन बदलला आणि नवीन म्युटेशनचे रुग्ण सापडले तर आरोग्य यंत्रणेवर नक्कीच ताण पडू शकतो. त्यामुळे येणाऱ्या दोन-तीन दिवसांमध्ये आढावा घेऊन निर्बंध अधिक कडक करण्याबाबत विचार सुरु आहे. आपली वाटचाल ही लॉकडाऊनच्या दिशेने सुरु आहे. लोकांना आता गांभीर्याने वागावंच लागेल. मास्क घातले नाही, सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं नाही तर लॉकडाऊन लावावंच लागेल.”
यावेळी बोलत असताना राजेश टोपे यांनी राज्यात लसीकरणाचा वेग वाढवण्याबाबत चर्चा झाल्याचंही सांगितलं. आजही अनेक लोकं आपल्यात सौम्य लक्षणं आढळली तरीही डॉक्टरांकडे जात नाहीत, घरीच थांबतात. काही वेळाने परिस्थिती गंभीर होते आणि मग ते डॉक्टरकडे जातात. त्यामुळे आपल्यात सौम्य लक्षणं दिसून आली तरी डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करुन घ्या असं आवाहन राजेश टोपेंनी यावेळी बोलत असताना केलं.
उप-राजधानीला कोरोनाचा विळखा, रविवारी ५८ जणांचा मृत्यू
वेळीच चाचणी न केल्याचे गंभीर परिणाम दिसताहेत
गेल्या वर्षी १७ सप्टेंबर रोजी ३ लाख सक्रीय रुग्ण होते आणि ३१ हजार ३५१ मृत्यू झाले होते. मात्र आता २७ मार्च रोजी ३ लाख ३ हजार ४७५ सक्रीय रुग्ण असून मृत्यूंची संख्या ५४ हजार ७३ झाल्याने चिंता वाढली आहे. विशेषत: संसर्ग वाढल्यास त्या प्रमाणात मृत्य वाढू शकतात आणि यामागे वेळेवर चाचणी न करून रुग्णालयांत भरती होण्यास उशीर करणे तसेच होम आयसोलेशनमध्ये असतानाही नियमांचे पालन न करणे ही कारणे असू शकतात असेही टास्क फोर्सच्या डॉक्टर्सनी निदर्शनास आणले. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये एका दिवशी २४ हजार ६१९ रुग्ण आढळले होते. काल २७ मार्च रोजी एका दिवशी ३५ हजार ७२६ रुग्ण आढळले असून ही संख्या येत्या २४ तासांत ४० हजार झालेली असेल अशीही माहिती आरोग्य विभागाने दिली.
लॉकडाऊनच्या दृष्टीने प्रशासनाने नियोजन करावे- मुख्यमंत्री
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट निर्देश दिले की, “एकीकडे आपण कोविड परिस्थितीतही अर्थव्यवस्था सुरु राहील याचा आटोकाट प्रयत्न करतोय मात्र अनेक घटक अजूनही ही गोष्ट गांभीर्याने घेत नाहीत. अजूनही खासगी कार्यालयातून उपस्थिती नियमांचे पालन होत नाही, विवाह समारंभ नियम तोडून सुरु आहेत, तसेच बाजारपेठांमध्ये देखील सुरक्षित अंतर, मास्क याचे पालन होताना दिसत नाही. शेवटी लोकांच्या आरोग्याचे संरक्षण करणे याला आमचे प्राधान्य आहे. त्यामुळे अतिशय कठोरपणे नियमांचे पालन करावे अन्यथा लॉकडाऊन करावं लागेल असे समजून धान्य पुरवठा, औषधी, अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सुविधा यांचे नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी मुख्य सचिवांना दिले.
ADVERTISEMENT