महाराष्ट्रात दिवसभरात 4 हजार 342 नव्या कोरोना रूग्णांचं निदान झालं आहे. तर राज्यात दिवसभरात 55 कोरोना रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के इतका आहे. राज्यात दिवसभरात 4 हजार 755 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण 62 लाख 81 हजार 985 कोरोना रूग्ण बरे झाले आहेत.
ADVERTISEMENT
62 लाख 81 हजारांहून अधिक रूग्ण आत्तापर्यंत बरे झाल्याने राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 97.4 टक्के इतका झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 43 लाख 27 हजार 469 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी एकूण 64 लाख 73 हजार 674 नमुने आजवर पॉझिटिव्ह आले आहेत.
महाराष्ट्रात सध्या 2 लाख 87 हजार 385 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत, तर 1971 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला 50 हजार 607 सक्रिय रूग्ण आहेत. आज महाराष्ट्रात 4 हजार 342 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या 64 लाख 73 हजार 674 इतकी झाली आहे.
कोव्हिडच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन विविध उपाययोजना करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोव्हिड राज्य कृती दलाने रविवार 5 सप्टेंबर रोजी ‘माझा डॉक्टर’ ऑनलाईन वैद्यकीय परिषद आयोजित केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे परिषदेत सहभागी होणार, असून त्यांच्या संबोधनाने परिषदेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख उपस्थित राहणार आहेत.
रविवारी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत होणारी परिषद समाज माध्यमांवरून प्रसारित केली जाणार आहे. राज्यातील सर्व फॅमिली डॉक्टर्स, वैद्यकीय तज्ञ तसेच नागरिकांनाही परिषदेस ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहता येणार आहे.
राज्यातील कोरोना संसर्गाची दुसरी लाट अद्यापही ओसरलेली नाही. अद्यापही दररोज नवीन कोरोना रूग्ण आढळून येत आहेत. तसेच तज्ञांनी करोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता देखील वर्तवली आहे. डेल्टा प्लस या विषाणूच्या संसर्गाचा धोकाही आहेच. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारतर्फे कोरोनाची तिसरी लाट येऊ नये म्हणून योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत. ठाकरे सरकारकडून निर्बंध जरी शिथील करण्यात आले असले, तरी देखील मुख्यमंत्र्यांनी रूग्णसंख्या वाढल्यास पुन्हा लॉकडाउनचा इशारा देखील दिलेला आहे.
ADVERTISEMENT