कोरोनाची दुसरी लाट अनेकांच्या जीवावर उठली आहे. या काळात अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. मुंबईकरांची लाईफ लाईन म्हणून ओळख असलेली मुंबई लोकल गेल्या काही महिन्यांपासून सर्वसामान्यांसाठी बंद आहेत. परंतू नोकरीसाठी कर्जत-बदलापूर-कल्याण भागातून मुंबईला यावं लागणाऱ्या अनेकांना याचा फटका बसतोय. काही लोकं जोखीम पत्करत रेल्वेतून प्रवास करतायत. अशा वेळी सामान्य लोकांना मुंबई लोकल बंद असल्यामुळे कसा त्रास सहन करावा लागतोय हे सांगणारा एका तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
ADVERTISEMENT
परळ रेल्वे स्थानकावर या तरुणाला टीसीने पकडल्यानंतर त्याच्याकडून दंड स्विकारण्यात आला. यावेळी तरुणाने व्हिडीओ शूट करत आपलं म्हणणं मांडलं. काय म्हणतो आहे हा तरुण व्हिडीओमध्ये जाणून घ्या…
“कोरोनामुळे मी गेल्या एक ते दीड वर्षांपासून घरी होतो. नुकताच कामाला लागलोय. माझा आजचा कामाचा दुसराच दिवस आहे. टीसींची काहीच चूक नाही, ते त्यांचं कर्तव्य पार पाडत आहेत”, असं या तरुणाचं म्हणणं आहे. कर्तव्य बजावणाऱ्या टीसींना त्याने कोणताच दोष दिलेला नाही. या तरुणाने या व्हीडिओच्या माध्यमातून सरकारसमोर रेल्वे बंद असल्याने सर्वसामान्यांना होणारा त्रास दाखवून दिला आहे.
“सर्वसामन्यांचं हातावर पोट असतं. ते रोज कमावतात अन रोज खातात, अशांनी लोकल बंद असल्याने काय करावं, काय खावं. सरकारला याबाबतीत केव्हा जाग येणार”, असा प्रश्न या तरुणाने सरकारला केला आहे. माझ्या बँक खात्यात केवळ 400 रुपये आहेत. मी दरमहा 35 हजार रुपये पगार घ्यायचो. दीड वर्षांपासून बेरोजगार होतो. त्यानंतर आता मोठ्या प्रयत्नांनंतर मला पुन्हा नोकरी मिळाली आहे. या नोकरीच्या दुसऱ्याच दिवशी टीसीनी मला पकडलं. रेल्वे तिकीट किंवा पास मिळत आम्हाला मिळत नाहीत. आम्ही काही सरकारी कर्मचारी नाहीत, म्हणून आम्ही गुन्हेगार आहोत का?” असा उद्विग्न सवाल या तरुणाने सरकारला केला आहे.
ADVERTISEMENT