18 वर्ष वयाच्या आतील मुंबईकरांची लोकल रेल्वेतून प्रवास करण्याची प्रतिक्षा अखेर संपली. राज्य सरकारने परवानगी देण्याची सूचना केल्यानंतर मध्य आणि पश्चिम रेल्वेनं 18 वर्षाखालील मुलांना लोकल रेल्वेतून प्रवास करू देण्याचा निर्णय घेतला असून, आजपासून निर्णय लागू करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या पाठोपाठ जनरेट्यानंतर दोन लस घेतलेल्या नागरिकांना 15 ऑगस्टपासून लोकल प्रवासास परवानगी देण्यात आली होती. आतापर्यंत ज्या लोकांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले आहेत आणि लसीकरणाला 14 दिवस पूर्ण झाले आहेत अशांना रेल्वे प्रवासासाठी पास देण्यात येतो. त्यानंतर आता 18 वर्षांखालील मुलांनाही लोकल प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
परवानगी देताना काही अटीही घालण्यात आलेल्या आहेत. लोकल प्रवासासाठी 18 वर्षांखालील मुला-मुलींना मासिक पासच घ्यावा लागणार आहे. त्यांना तिकीट सुविधा नसणार आहे. मासिक पास घेण्यासाठी तिकीट खिडक्यांवर त्यांना पुरावा म्हणून ओळखपत्र दाखवावे लागणार असून, प्रवासावेळीही पास आणि ओळखपत्रही सोबत बाळगावे लागेल, असे मध्य व पश्चिम रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.
18 वर्षांखालील मुलांचं लसीकरण होत नसल्याने त्यांना लोकल प्रवास करण्यावर बंधनं येत होती. त्यामुळे शाळा, महाविद्यालयांत जाण्यासाठी त्यांच्यापुढे प्रवासाची मोठी समस्या निर्माण झाली होती. अठरा वर्षांखालील मुलांना लसीकरण झालेले म्हणून ग्राह्य धरण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला. त्यानंतर तशी सूचना रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली.
18 वर्षाच्या आतील वयोगटातील मुलांबरोबरच काही महत्त्वाच्या वैद्यकीय कारणांसाठी प्रवास करावा लागणाऱ्यांनाही परवानगी देण्यात आली आहे. ज्या लोकांना लस घेता येत नाही अशांनाही रेल्वे प्रवासासाठी टिकीट मिळणार आहे. अशा लोकांनी टिकीट काढतेवेळी तसं डॉक्टरांचं प्रमाणपत्रक सादर करणं आवश्यक असणार आहे.
ADVERTISEMENT