चारित्र्याच्या संशयावरुन धारदार शस्त्राने आपल्या पत्नीची हत्या करणाऱ्या आरोपी पतीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईच्या साकीनाका परिसरातील खैरानी रोड भागात राहणाऱ्या रीमा यादवच्या हत्येचं गुढ पोलिसांनी अवघ्या काही तासात उलगडलं.
ADVERTISEMENT
आरोपी पतीच्या नाकाखाली रक्ताचे थेंब उडाल्याचं पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली आहे.
मयत रीमा यादव खैरानी रोड परिसरातील एका कंपनीत कामाला होती. रीमाचा आपल्या 22 वर्षीय पतीसोबत गेल्याकाही दिवसापासून वारंवार वाद होत होता. रीमाच्या पतीला तिच्या चारित्र्यावर संशय होता ज्यामुळे दोघांमध्येही वारंवार खटके उडत होते. या सततच्या वादाला कंटाळून रीमाने आपलं घर सोडून मित्रांसोबत रहायला सुरुवात केली. घटनेच्या 10 दिवसांआधी रीमाची नोकरीही सुटली होती.
सोमवारी रात्री साडेनऊ वाजता रीमा जेवून झोपली. मंगळवारी सकाळी रीमाचा मित्र तिला नाश्ता घेऊन घरी आला असता त्याला रिमा रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. स्थानिकांनी साकीनाका पोलिसांना याबाबतची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहचत रिमाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी हॉस्पिटलमध्ये पाठवला.
रिमाच्या गळ्यावर धारदार शस्त्रांनी वार केल्याचं पोलिसांना लक्षात आलं होतं. ज्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली. याचसोबत पोलिसांनी आपल्या सर्व खबऱ्यांनाही कामाला लावलं. एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांना रिमाचा पती दिसून आला. ज्यानंतर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. सुरुवातीला पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी रिमाच्या पतीने तिच्या मित्रांवर संशय घ्यायला सुरुवात केली. परंतू नाकाच्या खाली रक्ताच्या थेंबाकडे पोलिसांचं लक्ष गेलं आणि त्यांचा संशय बळावला. यानंतर पोलीसी खाक्या दाखवल्यानंतर रिमाच्या पतीने आपला गुन्हा कबूल केला. अवघ्या पाच तासात मुंबई पोलीसांना हत्येचं गुढ उकललं आहे.
ADVERTISEMENT