–शिवशंकर तिवारी, अंधेरी
ADVERTISEMENT
लॉकडाऊनच्या काळातही सुरू राहिलेल्या अंधेरीतील दीपा बारचा अखेर रविवारी रात्री पर्दाफाश झाला. मुंबई पोलिसांच्या सामाजिक सेवा शाखेने केलेल्या कारवाईत बारच्या नावाखाली डान्सबार सुरू असल्याचं उघड झालं. पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल 17 बारबालांना ताब्यात घेण्यात आलं. भिंतीत करण्यात आलेल्या भुयारात या महिलांना लपवण्यात आलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी बारच्या मॅनेजर, कॅशिअरसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मुंबईतील अंधेरी परिसरात असलेल्या दीपा बारवर मुंबई पोलिसांच्या सामाजिक सेवा शाखेने रविवारी रात्री धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी 17 बारबालांना ताब्यात घेतलं असून, बारचा मॅनेजर, कॅशिअरसह तिघांविरुद्ध अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. महिलांकडून देहविक्री करून घेतली जात असल्याचाही पोलिसांना संशय होता. कारवाईवेळी भिंतीमध्ये तयार करण्यात आलेल्या भुयारी खोलीत या बारबालांना लपवण्यात आलं होतं.
अंधेरीतील दीपा बारबद्दल बऱ्याच दिवसांपासून पोलिसांकडे तक्रारी केल्या जात होत्या. लॉकडाऊनच्या काळातही हा बार सुरू होता. इतकंच नाही, तर बारच्या नावाखाली डान्सबार सुरू असल्याच्याही तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत पोलिसांनी तपास सुरू केला होता.
अंधेरीत प्रसिद्ध असलेल्या दीपा बारमध्ये डान्सबार सुरू असल्याच्या तक्रारींवरून पोलिसांनी अनेकवेळा धाड टाकली. मात्र, प्रत्येकवेळी पोलिसांच्या हाती काहीच लागलं नाही. पोलिसांनी प्रत्येकवेळी बाथरूम, स्टोरेज रुम, किचन आदी ठिकाणी झाडाझडती केली. मात्र, डान्सबारबद्दलचे पुरावे हाती लागले नाही. यासंबंधात पोलिसांनी बारचा मॅनेजर, कॅशिअर आणि वेटर्संचीही चौकशी केली. चौकशीतही काहीच हाती लागले नाही.
वारंवार धाडी टाकूनही पोलिसांना दीपा बारमध्ये डान्सबार सुरु असल्याचे पुरावे मिळालेच नाही. दरम्यान, एका एनजीओने दीपा बारमधील डान्सबारबद्दल तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत मुंबई पोलिसांच्या सामाजिक सेवा शाखेनं रविवारी रात्री बारवर धाड टाकली.
आरशामुळे फुटलं बिंग…
धाड टाकल्यानंतर सामाजिक सेवा शाखेच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी नेहमीप्रमाणे बारमध्ये सगळीकडे झाडाझडती घेतली. मात्र, काहीच आढळून आलं नाही. मात्र, त्यानंतर मेकअप रुममधील आरशाकडे अधिकाऱ्याचं लक्ष गेलं. हा आरशा अपेक्षित आकारापेक्षा मोठा असल्याचं दिसून आलं आणि अधिकाऱ्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.
त्यानंतर दीपा बारमध्ये असलेल्या भल्यामोठ्या आरशावर पोलिसांनी हातोडा चालवला. या आरशामागे भिंतीत एक भुयारसदृश्य खोली आढळून आली. ज्यात तब्बल 17 बारबालांना लपवण्यात आलं होतं. पोलिसांनी आरसा तोडल्यानंतर त्या पाठीमागे असलेल्या खोलीतून बारबालांना बाहेर काढण्यात आलं आणि ताब्यात घेण्यात आलं.
ADVERTISEMENT