कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा जगभरात प्रादुर्भाव होण्यास सुरूवात झाली असून, महाराष्ट्रातही प्रतिबंधात्मक पावलं उचलली जात आहे. त्यामुळे 1ली ते 7वीचे वर्ग सुरू करण्याच्या निर्णयाबद्दल शंका उपस्थित होती. राज्य सरकारने शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. मुंबई-पुणे महापालिका प्रशासनानेही शाळा सुरू करण्याची भूमिका घेतली आहे. मात्र, शाळा 15 डिसेंबरपासून सुरू केल्या जाणार आहेत.
ADVERTISEMENT
मुंबई महापालिका शाळा का उशिराने सुरु करणार?
मुंबई महापालिका पहिली ते सातवीचे शाळा सध्या सुरू करणार नाही, अशी चर्चा होती. मात्र, महापालिकेनं शाळा सुरू करण्याची भूमिका घेतली आहे. मात्र, १५ दिवस उशिराने शाळा सुरू होणार आहेत.
याबद्दल ‘मुंबई Tak’ बोलताना बृहन्मुंबईचे शिक्षणाधिकारी राजू तडवी म्हणाले, ‘शाळा सुरू करण्याचा महाराष्ट्र सरकारचा आदेश आम्हाला काल (29 नोव्हेंबर) मिळाला. असं असलं तरी कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्यास दोन आठवड्यांचा वेळ आम्हाला लागणार आहे.’
‘विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पाल्यांची मानसिक तयारी आणि परवानगी घ्यावी लागणार आहे. त्याचबरोबर शाळा सॅनिटाईज करण्यासाठीही वेळ लागणार आहे. त्यामुळे मुंबईतील पहिली ते सातवीचे वर्ग 15 डिसेंबरपासून सुरू होतील’, असं शिक्षणाधिकारी तडवी म्हणाले. 15 डिसेंबरनंतर कोरोनामुळे परिस्थिती बिघडली, तर निर्णय पुढे ढकलला जाईल, असंही तडवी यांनी स्पष्ट केलं.
Maharashtra School : आदेश निघाला! राज्यातील शाळा उद्यापासूनच होणार सुरू
पुण्यात निर्णय पुढे ढकलला…
१ डिसेंबरपासून पहिली ते सातवीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय पुणे महापालिका प्रशासनाने पुढे ढकलला आहे. पुणे महापालिका प्रशासनाने याची माहिती दिली आहे. पहिली ते आठवीच्या शाळा आता 15 डिसेंबपरपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. 15 डिसेंबरपर्यंत परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे. पालक संघटना आणि शिक्षण संस्था यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, असं पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आधीच स्पष्ट केलं होतं. त्यानंतर मनपाच्या बैठकीत शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
ADVERTISEMENT