Mumbai Tak Impact: आत्महत्या केलेल्या ‘त्या’ मुलीच्या कुटुंबीयांना तात्काळ आर्थिक मदत

मुंबई तक

• 01:54 AM • 24 Oct 2021

अमरावती: अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील छिदवाडी येथील शेतकरी कुटुंबातील सेजल जाधव या तरुण मुलीने शेतकरी आई-वडिलांवर असलेल्या कर्जाच्या काळजीपोटी आत्महत्या केल्याच्या घटनेने अवघा महाराष्ट्र हादरुन गेला आहे. याच घटनेची बातमी जेव्हा ‘मुंबई तक’ने समोर आणली त्यानंतर राज्य सरकारला देखील खडबडून जाग आली आणि तात्काळ आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना आर्थिक मदतही करण्यात आली. ‘मुंबई तक’च्या बातमीनंतर महिला व […]

Mumbaitak
follow google news

अमरावती: अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील छिदवाडी येथील शेतकरी कुटुंबातील सेजल जाधव या तरुण मुलीने शेतकरी आई-वडिलांवर असलेल्या कर्जाच्या काळजीपोटी आत्महत्या केल्याच्या घटनेने अवघा महाराष्ट्र हादरुन गेला आहे. याच घटनेची बातमी जेव्हा ‘मुंबई तक’ने समोर आणली त्यानंतर राज्य सरकारला देखील खडबडून जाग आली आणि तात्काळ आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना आर्थिक मदतही करण्यात आली.

हे वाचलं का?

‘मुंबई तक’च्या बातमीनंतर महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी संबंधित कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी यशोमती ठाकूर यांनी सेजलच्या भाऊ-बहिणीला शिक्षणासाठी दत्तक घेतले आहे. तसेच जाधव कुटुंबीयांना तात्काळ आर्थिक मदतही देऊ केली असल्याचे समजते आहे.

‘एखाद्या विद्यार्थ्याने असा विचार करावा व स्वत:चे जीवन संपवावे, ही मन सुन्न करून टाकणारी घटना आहे. ही वेदना शब्दांत मांडता येणार नाही. आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल कुणीही उचलू नये. आत्महत्या हा उपाय नाही. संकट आले तर खचून जाऊ नका. एकदा जीव गेला तर तो पुन्हा मिळणार नाही. विद्यार्थी व तरूणांनी नैराश्येच्या गर्तेत जाऊ नये.’ असे आवाहन यशोमती ठाकूर यांनी केले आहे.

‘जाधव कुटुंबीयांचा एक सदस्य म्हणून मी कायम त्यांच्या पाठीशी राहीन. आत्महत्याग्रस्त कुटुंबाला शासनाच्या वतीने मदत मिळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील. परंतु अशा घटना घडू नये म्हणून प्रभावी समुपदेशन यंत्रणा उभी करण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्यासंबंधी प्रशासनाला आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देशही दिले जातील.’ असंही यशोमती ठाकूर यावेळी म्हणाल्या.

‘… म्हणून मी जीवन संपवतेय’; आईवडिलांवरील कर्जामुळे शेतकऱ्याच्या मुलीची आत्महत्या

नेमकी घटना काय?

एका शेतकऱ्याच्या मुलीने कुटुंबावरील कर्जाबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

‘आईवडिलांना ओझे नको म्हणून मी हे जीवन संपवित आहे’, असं म्हणत सेजलने टोकाचं पाऊल टाकलं. १७ वर्षीय मुलीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. अमरावती जिल्ह्यातील कुऱ्हा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या छिदवाडी येथे ही घटना घडली.

आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत सेजलने स्वतःच्या मनातील व्यथा मांडली आहे. ‘वडिलांना शेतमजुरी व तीन एकर शेती करून उदरनिर्वाह करावा लागतो. त्यात सतत होत असलेली नापिकी व घरातील आर्थिक परिस्थितीमुळे आयुष्य जगणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. त्यातही दोन बहिणी एक लहान भाऊ अशा सर्वांच्या पोटाचा व भविष्याचा बिकट प्रश्न आहे. त्यामुळे माझे ओझे कमी व्हावे, याकरिता मी आपले जीवन संपवित आहे.’ असे लिहून सेजलने पंख्याला गळफास घेत जीवन संपवलं.

    follow whatsapp