Raj Thackeray: मुंबईकरांनी खूप सहन केलं, आता मुंबईची लोकल सुरु करा: राज ठाकरे

मुंबई तक

• 09:57 AM • 22 Jul 2021

मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या अद्यापही म्हणावी त्या प्रमाणात नियंत्रणात आलेली नाही. त्यामुळे राज्य शासनाने अद्यापपर्यंत मुंबईतील लोकल सेवा सुरु केलेली नाही. पण आता मुंबईकरांनी खूप सहन केलं असून तातडीने मुंबईची लोकल सेवा सुरु करावी अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. यावेळी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक सविस्तर पत्र लिहून यासंबंधीची […]

Mumbaitak
follow google news

मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या अद्यापही म्हणावी त्या प्रमाणात नियंत्रणात आलेली नाही. त्यामुळे राज्य शासनाने अद्यापपर्यंत मुंबईतील लोकल सेवा सुरु केलेली नाही. पण आता मुंबईकरांनी खूप सहन केलं असून तातडीने मुंबईची लोकल सेवा सुरु करावी अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.

हे वाचलं का?

यावेळी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक सविस्तर पत्र लिहून यासंबंधीची मागणी केली आहे.

पाहा राज ठाकरे यांनी पत्रात नेमकं काय म्हटलं आहे:

गेल्या 15 महिन्यांपासून देशाप्रमाणे महाराष्ट्रात अनेक प्रकारचे निर्बंध महाराष्ट्र सरकारने लागू केले आहेत. हे निर्बंध आपण सर्वच जण पाळत आलो आहोत. पण आजकाल हे निर्बंध नक्की कोणासाठी असा प्रश्न पडू लागला आहे. त्यातल्या त्यात सध्या मुंबई शहरासाठी जे निर्णय घेतले जात आहेत ते तर अनाकलनीय आहेत.

मुंबईतील जवळजवळ सर्व कार्यालयं सुरु आहेत. सर्वांना घरुन काम करता येणं शक्य नाही. यासाठी त्यांना रोज अनेक तास प्रवास करावा लागतो आहे. त्यात लोकल सेवा बंद असल्यामुळे मुंबईकरांचे अतोनात हाल होत आहेत.

महाराष्ट्र सरकारने बस सेवेला परवानगी दिली; पण लोकल बंद असल्याने या बसमध्ये प्रचंड गर्दी होत असते. अशा गर्दीत प्रवास केल्याने रोगही अधिक पसरण्याचा धोका आहे. त्यामुळे ‘बस सुरु आणि लोकल बंद’ ह्यानं नेमकं काय साध्य होणार?

ही साथ एकाएकी जाणार नाही असं जगातल्या तज्ञांचं मत आहे. त्यामुळे यापुढे आपल्याला अशा साथींबरोबरच राहण्याची सवय करुन घेण्याची गरज आहे, आणि त्याला धरुनच योग्य निर्णय, उपाययोजना आपल्याला करायला हव्यात.

लसीकरणाचा वेग वाढवणं गरजेचं आहेच परंतु त्यासोबतच धोरण आखणीमध्ये अधिक कल्पकता दाखवायला हवी. पण दिसतंय असं की महाराष्ट्र सरकारला अजूनही टाळेबंदी आणि निर्बंधांच्या पलीकडे काही सुचत नाही.

महाराष्ट्र सरकारनं निर्बंध शिथिल करण्यासाठी आणि मुख्य म्हणजे मुंबईची लोकल सेवा सुरु करण्यासाठी आता तातडीनं पावले उचलावीत. सर्वसामान्य माणसानं आत्तापर्यंत खूप सहन केलं आणि त्याची सहन करण्याची क्षमता आता संपत चालली.

त्यामुळे आता यापुढे सरकारकडून काही सकारात्मक उपाय केले गेले नाहीत तर कडेलोट होईल. त्या परिस्थितीत माझा पक्ष मुंबईकरांसोबत तर उभा राहीलच परंतु लोकल प्रवास तातडीनं सुरु करण्यासाठी आंदोलन सुरु करेल.

Corona संपेपर्यंत मुंबई लोकल बंदच राहणार-विजय वडेट्टीवार

त्यामुळे मी माझ्या पक्षातर्फे मुख्यमंत्र्यांना अशी मागणी करतो आहे की मुंबईकरांचे रोजचे हाल थांबविण्यासाठी मुंबईची लोकल सेवा, निदान ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत अशा सर्वांसाठी तरी अत्यंत तातडीनं सुरु केली जावी.

विविध प्रकारच्या मोहीमा हातात घेऊन लसीकरण वाढवावे म्हणजे अधिकाधिक लोक लोकल प्रवासाचा लाभ घेऊ शकतील, आणि मुंबईचं अर्थचक्र पुन्हा सुरळीत सुरु होईल. मला अपेक्षा आहे की, महाराष्ट्र सरकार ह्या सगळ्याचा विचार करुन त्वरीत पावलं उचलेल.

    follow whatsapp