कल्याण: जामिनासाठी मदत न केल्याच्या रागातून तरुणाची हत्या केल्याची घटना कल्याण मधील बारावे येथे घडली आहे. याप्रकरणी हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी गुजरातमधील गोध्रामधून अटक केली आहे. तर या खुनामध्ये आणखी आरोपी सहभागी असण्याची शंका मृताच्या कुटुंबाने व्यक्त केली आहे. यावेळी मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी पोलिसांनी योग्य तपास करून न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे.
ADVERTISEMENT
कल्याणमधील बारावे परिसरात राहणारा मुकेश रमेश देसाईकर व शेरखान मुद्दिंग खान हे दोघे एकमेकांचे चांगले मित्र होते. पण यातील शेरखानने आपल्याच मित्राची निर्घृण हत्या केली. ज्याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
मागील काही दिवसापूर्वी हत्यार बाळगल्याच्या आरोपात मुकेश देसाईकर आणि शेरखान हे दोघेही तुरुंगात होते. मात्र, यावेळेस मुकेशने आपला मित्र शेरखानला जामिनावर सुटका करण्यास मदत न करता स्वतः जामीन मिळवत आपली सुटका करून घेतली.
यावेळी मुकेशने शेरखानला जामीनवर सुटका करण्यासाठी कोणतीच मदत केली नाही. अखेर बरेच दिवस कारागृहात राहिल्यानंतर शेरखानची जामिनावर सुटका झाली. त्यानंतर शेरखानने मुकेशबरोबर आपली मैत्री तोडून टाकली. मात्र एकाच परिसरात राहत असल्याने मुकेश शेरखानला बोलवून वारंवार मारहाण करत असे.
अखेर या त्रासाला कंटाळून आणि जामीन मिळवून देण्यासाठी मदत न केल्याच्या रागातून शेरखानने एक कट रचला आणि 7 ऑक्टोबर रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास मुकेशला घरातून एकटा बाहेर आलेला पाहून शेरखाने धारदार शस्त्राने मुकेशची हत्या केली. या हत्येनंतर समशेर आपला मोबाईल स्विच ऑफ करून घटनास्थळावरुन फरार झाला.
दरम्यान, हत्येची माहिती मिळताच खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत याप्रकरणी तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना सीसीटीव्हीमध्ये आरोपी शेरखान असल्याचे दिसून आले. पोलिसांनी तात्काळ वेगवेगळ्या टीम बनवत शेरखानच्या सर्व मित्रांना आपल्या ताब्यात घेत शेरखानचा फोन यायची वाट पाहली.
अखेर गावी जाण्यासाठी शेरखानला पैसे कमी पडल्याने शेरखानने आपल्या मित्रांना फोन केले आणि तो सहजपणे पोलिसांच्या जाळ्यात अडकला. पोलिसांनी लगेचच आलेल्या फोनची माहिती घेत शेरखानला गुजरातमधील गोध्रामधून अटक करत आपला पुढचा तपास सुरू केला आहे .
दुसरीकडे या प्रकरणात मुकेशच्या कुटुंबीयांनी या हत्येच आणखी काही आरोपी असण्याची शंका व्यक्त केली आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांनी सखोल तपास करावा आणि इतरही आरोपींना अटक करावी अशी मागणी केली आहे.
ADVERTISEMENT