फतेहपूर (उत्तर प्रदेश): ‘देशातील मुस्लिम महिला या आज मला कानकोपऱ्यातून आशीर्वाद देत आहेत कारण मी त्यांच्या आयुष्याची सुरक्षा केली आहे.’ असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणूक प्रचार सभेसाठी ते फतेहपूर येथे आले होते. तिथेच बोलताना त्यांनी तीन तलाकला विरोध करणाऱ्यांना खडे बोल सुनावले. तर याच निमित्त मुस्लिम महिला मतदारांना चुचकारलं देखील.
ADVERTISEMENT
पाहा पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले:
‘केंद्र सरकारने जेव्हा तीन तलाकविरोधात कायदा बनवला तेव्हा अनेक जण या कायद्याच्या विरोधात आणि तीन तलाकच्या समर्थनार्थ उभे राहिले. मी हैराण झालो होतो की हे लोकं कोणत्या शतकात जगत आहेत. की एवढ्या स्वार्थामध्ये बुडालेले आहेत जे लोकं त्यांना मतदान करतात त्यांच्या भल्याचा देखील ते विचार करत नाही. अशा लोकांवर कधी विश्वास ठेवता येईल?’
‘माझ्या मुस्लिम माता-भगिनींना छोट्या-छोट्या गोष्टींवरुन तीन तलाक, तीन तलाक बोललं जायचं. झाली सुट्टी.. ती मुलगी बिचारी कुठे जाईल?, त्या वडिलांचा विचार करा की, त्यांनी किती उत्साहाने मुलीचं लग्न लावून तिला सासरी पाठवलं असेल. पण तीन तलाक म्हणून तिच्याशी घटस्फोट घेऊन तिला पुन्हा माहेरी पाठवलं जायचं. ते देखील एक-दोन मुलांसोबत. तेव्हा मुलीच्या वयोवृद्ध आई-वडिलांचे नेमके काय हाल होत असतील याचा विचारच न केलेला बरा.’
‘मला सांगा तुम्ही या माता आणि बहिणींची सुरक्षा मी केली पाहिजे की नाही. त्यांचं भलं केलं पाहिजे की नाही पाहिजे. मी काय मतदानाचाच विचार केला पाहिजे?, खुर्चीबाबतच विचार केला पाहिजे का?, देशाचा देखील विचार केला पाहिजे ना.’
‘पण अनेकांचा तीन तलाक देखील विरोध होता. आज देशातील कोनाऱ्याकोपऱ्यातून मला मुस्लिम महिला भगिनी आशीर्वाद देत आहेत कारण त्यांच्या जीवनाच्या सुरक्षेचं खूप मोठं काम मी केलं आहे.’ असं म्हणत मोदींनी उत्तरप्रदेशमध्ये मुस्लिम महिला मतदारांना देखील आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.
ज्यांच्या रक्तात मुस्लिम समाजाबद्दल विष अशा जातीयवादी भाजपला जाब विचारला पाहिजे-दत्तात्रय भरणे
2019 मध्ये भाजप पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने सत्तेत आल्यानंतर काही महिन्यांच्या आतच तीन तलाक कायदा अंमलात आणला होता. ज्याला काही जणांनी विरोध केला होता. त्यामुळे हे प्रकरण कोर्टात गेलं होतं. पण कोर्टाने देखील तीन तलाक अयोग्य असल्याचा निर्णय दिला. ज्यानंतर तीन तलाकविरोधी कायदा देशात लागू झाला. त्यामुळे आता हाच मुद्दा पुढे करुन पंतप्रधान मोदी उत्तरप्रदेशमध्ये पुन्हा एकदा भाजपला मतदान करण्याचं आवाहन करत आहेत.
ADVERTISEMENT