– योगेश पांडे, नागपूर
ADVERTISEMENT
एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह आढळून आल्यानं नागपूर शहरात खळबळ उडाली आहे. एका घरात पती-पत्नी आणि दोन मुलांचे मृतदेह आढळून आले. पत्नीसह दोन मुलांची चाकूने हत्या करून आरोपीने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, पत्नीसह दोन मुलांचे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह पाहून पोलिसांनाही धक्का बसला.
मदन अग्रवाल असं पत्नीसह दोन मुलांची हत्या करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. तर किरण अग्रवाल असं पत्नीचं नाव असून, वृषभ अग्रवाल (वय १०) व मुलगी टिया अग्रवाल (वय ५) अशी चिमुकल्यांची नावं आहेत.
नागपूर शहरातील जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या दयानंद पार्क परिसरात ही घटना घडली आहे. परिसरातील एका घरात पती-पत्नी आणि दहा व पाच वर्षाच्या मुलांचे मृतदेह आढळून आले. ही घटना समोर आल्यानंतर खळबळ उडाली.
मदन अग्रवाल हा चायनीज खाद्यपदार्थांचा स्टॉल चालवायचा. कर्जबाजारीपणातून त्याने कुटुंबासह स्वतःला संपवण्याचं टोकाचं पाऊल उचललं असावं, असं पोलिसांनी म्हटलं आहे. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पत्नी किरण अग्रवाल यांच्यासह दोन चिमुकल्यांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले.
मदन अग्रवाल याने आर्थिक अडचणीतून पत्नी आणि मुलांची चाकूने हत्या करून स्वतः आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांकडून घटनास्थळांची पाहणी करण्यात आली असून, पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
“एका व्यक्तीचा मृतदेह छताला गळफास घेतलेल्या अवस्थेत असल्याची माहिती पोलिसांना सायंकाळी मिळाली. त्यानंतर घरमालक आणि मयतांच्या नातेवाईकांसह घटनास्थळी पोहोचले. दरवाजा तोडल्यानंतर व्यक्ती गळफास घेतलेल्या अवस्थेत होता. तर पत्नी आणि दोन मुलांचे मृतदेह बेडवर पडलेले होते. धारदार शस्त्राने त्यांची हत्या केल्याचं प्रथमदर्शनी दिसून आलं. त्या व्यक्तीने पत्नी आणि मुलांची हत्या करून आत्महत्या केल्याचं दिसून येत आहे. कारण पोलिसांनी दार तोडून घरात प्रवेश केला”, अशी माहिती नागपूरचे डीआयजी नवीनचंद्र रेड्डी यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
ADVERTISEMENT