रविवारी दुपारी मंत्रालयातील आपत्ती निवारण कक्षाला एका निनावी फोनवरुन मंत्रालयात बॉम्ब असल्याची माहिती मिळाली. यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण परिसर रिकामा करुन पोलीस आणि बॉम्ब शोधक पथकाने तपासणी केली परंतू कुठेही बॉम्बसदृष्य वस्तू मिळाली नाही. हा फोन कॉल अफवा पसरवण्यासाठी केला असावा असा मुंबई पोलिसांनी अंदाज बांधला होता. तपासाअंती धमकीचा फोन नागपूरवरुन आल्याचं निष्पन्न झालं.
ADVERTISEMENT
नागपूर एटीएस आणि ग्रामीण पोलिसांना याबद्दल माहिती देण्यात आली. यानंतर दोन तासांनी पोलिसांनी उमरेड भागातून सागर मेंदरे या शेतकऱ्याला ताब्यात घेतलं. चौकशीदरम्यान सागरने आपणच हा फोन केल्याचं मान्य केलं. सागर मेंदरचे जमिन काही वर्षांपूर्वी अधिग्रहणात गेली, परंतू या जमिनीचा मोबदला अद्याप त्याला मिळाला नाही. यासाठी प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी आपण हा फोन केल्याचं सागरने सांगितलं आहे.
१९९७ पासून सागर मेंदरे आपल्या जमिनीच्या मोबदल्यासाठी पत्रव्यवहार करत आहेत. परंतू अद्याप त्यांना यश आलं नाही. सागर यांना हाडाचं दुखण असल्यामुळे त्याच्या उपचारासाठी पैशांची गरज होती. त्यातच जमिनीचा मोबदला मिळत नसल्यामुळे सागर चिंतेत होता. याआधीही त्याने अशाच पद्धतीने बॉम्ब ठेवल्याचा फोन केल्याचं समोर आलंय. दरम्यान नागपूर एटीएसने सागर मेंदरेला उमरेड पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.
ADVERTISEMENT