आपली प्रेयसी दुसऱ्यासोबत गेल्यामुळे प्रेमात अपयश आल्याच्या भावनेतून संतप्त झालेल्या एका तरुणाने प्रेयसीचं अपहरण करुन तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपी मुलगा टीक टॉक स्टार असून त्याने प्रेयसीच्या अपहरणाचा व्हिडीओ व्हायरल केला. पोलिसांनी त्याच्या मोबाईलचं लोकेशन ट्रॅक करुन कोणताही अनुचित प्रसंग होण्यापासून टाळला आहे.
ADVERTISEMENT
समीर खान आणि साकेत सिद्दकी अशी अटक केलेल्या दोन आरोपींची नाव आहेत. आरोपी समीरचे एका तरुणीसोबत दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. काही दिवसांपूर्वी प्रेयसीचा वाढदिवस होता. त्यासाठी समीरच्या प्रेयसीने एका पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीत समीरच्या प्रेयसीचे काही मित्र-मैत्रीण सहभागी झाले होते. परंतू इथे समीरसोबत जास्त वेळ न घालवता प्रेयसीने आपल्या इतर मित्रांसोबत जास्त वेळ घालवल्यामुळे समीरच्या मनात शंका निर्माण झाली. यानंतर रागाच्या भरात त्याने आपल्या मित्रासह प्रेयसीच्या अपहरणाचा डाव रचला.
आपल्या प्रेयसीचं अपहरण केल्यानंतर समीरने व्हिडीओ बनवत तो इंस्ट्राग्राम अकाऊंटवर टाकला. या व्हिडीओत समीर प्रेयसीला अश्लील शिवीगाळ आणि मारहाण करत असल्याचं दिसलं. आरोपीने प्रेयसीला यशोधरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नेल्यानंतर तिकडेही मारहाण केली. अखेरीस पोलिसांनी आरोपीच्या मोबाईलचं लोकेशन ट्रॅक करुन त्याला अटक केली आहे. समीरने अनेकवेळा पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याचं निष्पन्न झाल्यामुळे त्याच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT