कोरोनावर उपचार करण्यासाठी आजही अनेक शहरांत रुग्णांना पायपीट करावी लागते आहे. रुग्णालयात बेड मिळाल्यानंतर काही जण बरे होऊन घरी परतत आहेत तर काहींची झुंज अपयशी ठरतेय. परंतू कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतरही या रुग्णांचे हाल थांबत नाहीयेत. नागपूर पोलिसांनी कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या शरिरावरचे दागिने, मोबाईल आणि इतर मुद्देमाल चोरणाऱ्या दोघांना अटक केली आहे.
ADVERTISEMENT
४५ वर्षांवरील सर्व व्यक्तींचं लसीकरण पूर्ण, महाराष्ट्रातलं हे गाव ठरतंय देशासाठी आदर्श
गांधीबाग पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी गणेश डेकाटे आणि छत्रपाल सोनकुसरे यांना अटक केली आहे. चौकशीदरम्यान या दोघांनी आतापर्यंत केलेल्या सर्व गुन्ह्यांची कबुली दिली आहे. गणेश आणि छत्रपाल हे दोघंही स्पिक अँड स्पॅन या कंपनीत काम करतात. या कंपनीला कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा मृतदेह हलवण्याचं कंत्राट मिळालं आहे. कोरोनाची बाधा झाल्यामुळे अंत्यसंस्काराच्यावेळीही मृत व्यक्तीच्या नातेवाईंकांना परवानगी मिळत नाही. याचा फायदा घेऊन हे दोन्ही आरोपी पीपीई किट घालून मृतांच्या शरिरावरचे दागिने व इतर माल चोरी करत असत.
नागपुरात राहणाऱ्या अंजली तिवारी यांच्या वडीलांचं १ एप्रिल रोजी कोरोनामुळे निधन झालं. परंतू आपल्या वडिलांचा १८ हजारांचा मोबाईल मिळाला नसल्यामुळे अंजली तिवारी यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी या मोबाईलचं लोकेशन आणि मेयो हॉस्पिटलचं सीसीटीव्ही फुटेज तपासलं असता दोन्ही आरोपींबद्दल माहिती मिळाली. यानंतर दोघांनाही पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. आतापर्यंत दोन्ही आरोपींनी ६ कोरोनाग्रस्त रुग्णांच्या शरिवावरील दागिने आणि मोबाईल चोरल्याचं मान्य केलंय.
पोलिसांनी दोन्ही आरोपींकडून १४ हजार ५०० रुपये रोख रक्कम, सोन्याचे दागिने, ८ लेडीज घड्याळं आणि काही मोबाईल असा १ लाख ६८ हजार २३१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय.
ADVERTISEMENT