नागपुरात ‘शिंदे पॅटर्न’ थोडक्यात हुकला! कंभालेंचं बंड अपयशी, काँग्रेसनं राखली सत्ता

मुंबई तक

• 04:06 AM • 18 Oct 2022

राज्यातल्या सत्तातरानंतर भाजप नागपूर जिल्हा परिषदेतही सत्तांतर घडवून आणण्याची शक्यता होत होती. मात्र, काँग्रेस नेत्यांनी वेळीच खबरदारी घेतल्यानं नागपूरमध्ये सत्ता कायम राखली. नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीपूर्वी घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे सत्तांतर होणार की काँग्रेसची सत्ता कायम राहणार याची सगळ्यांना उत्सुकता होती. काँग्रेसनं सत्ता राखली. दरम्यान, या निवडणुकीच्या निमित्ताने राज्यातल्या शिंदे पॅटर्नची पुनरावृत्ती […]

Mumbaitak
follow google news

राज्यातल्या सत्तातरानंतर भाजप नागपूर जिल्हा परिषदेतही सत्तांतर घडवून आणण्याची शक्यता होत होती. मात्र, काँग्रेस नेत्यांनी वेळीच खबरदारी घेतल्यानं नागपूरमध्ये सत्ता कायम राखली.

हे वाचलं का?

नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीपूर्वी घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे सत्तांतर होणार की काँग्रेसची सत्ता कायम राहणार याची सगळ्यांना उत्सुकता होती. काँग्रेसनं सत्ता राखली. दरम्यान, या निवडणुकीच्या निमित्ताने राज्यातल्या शिंदे पॅटर्नची पुनरावृत्ती नागपुरात होणार होती, ती थोडक्यात हुकली आहे.

नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसला सत्ता राखण्यात यश आलंय. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या मुक्ता कोकड्डे या अध्यक्षपदी विजयी झाल्या. तर कुंदा राऊत उपाध्यक्ष म्हणून निवडून आल्या आहेत.

भाजपच्या पडद्यामागून हालचाली, नाना कंभालेंचं बंड

जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीच्या निमित्तांनं सत्तांतर घडवून आणण्यासाठी भाजपचे पडद्यामागून प्रयत्न सुरू होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना कंभाले यांनी निवडणुकीत बंडाचं निशाण फडकावलं होतं.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कंभाले काँग्रेसच्या सदस्यांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू केले होते. कंभालेंकडून संपर्क सुरू झाल्यानंतर काँग्रेसच्या सदस्यांनी वरिष्ठ नेत्यांच्या कानावर या घटना घातल्या. त्यानंतर माजी मंत्री सुनील केदार, राजेंद्र मुळक, सुरेश भोयर यांनी पावलं उचलण्यास सुरुवात केली होती.

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी वेळीच आपल्या सदस्यांना फॉर्म हाऊसवर हलवलं. महत्त्वाची बाब म्हणजे अंतर्गत बंडाळी वा नाराजी उमटण्याच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या उमेदवारांची नावंही शेवटपर्यंत गुपित ठेवण्यात आली होती. त्यामुळे कंभालेंच्या माध्यमातून शिंदे पॅटर्न नागपूरात अवलंबला गेला, मात्र तो यशस्वी ठरला नाही. भाजपनं उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत कंभालेंना पाठिंबा दिल्यानं या बंडखोरांच्या मागे भाजप असल्याचं सांगितलं जातंय.

भाजपचा कंभालेंना पाठिंबा, जिल्हा परिषदेतील सत्ता काँग्रेसकडे कायम

भाजपतर्फे अध्यक्ष पदासाठी नीता वलके आणि उपाध्यक्ष पदासाठी कैलास बरबटे यांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, भाजपने अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून माघार घेतली. त्यानंतर काँग्रेसचे बंडखोर नाना कंभाले यांना उपाध्यक्ष पदासाठी पाठिंबा दिला होता. तर नागपूर जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या मुक्ता कोकड्डे अध्यक्ष म्हणून विजयी झाल्या, तर उपाध्यक्षपदी काँग्रेसच्याच जिल्हा परिषद सदस्य कुंदा राऊत या विजयी झाल्या आहेत.

महाविकास आघाडी

अध्यक्ष पदाच्या उमेदवाराला मिळालेली मतं – ३९

उपाध्यक्ष पदाच्या उमेदवाराला मिळालेली मतं – ३८

बंडोखोर उमेदवार

अध्यक्ष पदाच्या उमेदवाराला मिळालेली मतं – १८

उपाध्यक्ष पदाच्या उमेदवाराला मिळालेली मतं – १९

नागपूर जिल्हा परिषदेतील पक्षीय संख्याबळ

काँग्रेस-32

राष्ट्रवादी- 8

भाजप- 14

सेना ( शिंदे गट)- 1

शेतकरी कामगार पक्ष- 1

गोंडवाना गणतंत्र पक्ष – 1

अपक्ष- 1

    follow whatsapp