काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य समोर आलं आहे. त्याबाबत आज देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे की नाना पटोले यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यांना चांगल्या डॉक्टरांकडे दाखवण्याची गरज आहे. त्यामुळे पत्रकार परिषदेत एकच हशाही पिकला.
ADVERTISEMENT
नेमकं काय म्हणाले फडणवीस?
‘नाना पटोले यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. नागपूरमध्ये त्यांनी भाजपमधून उमेदवार घेतला. त्याची काय अवस्था पाहिली. भंडारा-गोंदिया निवडणुकीत त्यांची काय अवस्था झाली पाहिली. त्यामुळे त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. पक्षाच्या नेतृत्वाला मी विनंती करेन की त्यांना चांगल्या डॉक्टरांना दाखवा.’
काय आहे प्रकरण?
आपण मोदींना मारु शकतो, शिव्या देऊ शकतो असं वादग्रस्त विधान केलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. गोंदियात केलेल्या वक्तव्यानंतर भाजपने नाना पटोलेंविरुद्ध आक्रमक भूमिका घेत त्यांच्या अटकेची मागणी केली होती. हे प्रकरण शांत होतंय न होतंय तोच आज इगतपुरीमध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या कार्यशाळेदरम्यान नाना पटोलेंनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य करुन नवीन वादाला तोंड फोडलं आहे.
ज्याची बायको पळते त्याचं नाव मोदी ठरतं अशा आशयाचं वक्तव्य नाना पटोलेंनी केलेलं आहे. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या कार्यशाळेला मार्गदर्शन करताना नाना पटोलेंनी भाजप सरकारच्या धोरणांवर टीका केली. देशाचे मूळ मुद्दे बाजूला सारले जात आहेत. बेरोजगारांचा देश म्हणून आपली जगाच्या पाठीवर ओळख झाली आहे. महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे, त्यामुळे सामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. शेतकरी, व्यापारी तसेच छोट्या उद्योजकांचे प्रश्न वाढत चालले आहेत. केंद्र सरकार हे सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर अपयशी ठरले आहे, असा आरोपही त्यांनी केला.
ADVERTISEMENT