महाराष्ट्राला मुख्यमंत्रीच नाही; राणेंचा संजय राऊत, उद्धव ठाकरेंवर प्रहार

मुंबई तक

• 12:27 PM • 08 Apr 2022

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यावर हल्ला चढवला. राज्यावरील वीज टंचाईचं संकट, एसटी कर्मचाऱ्यांचा संप, यशवंत जाधव यांच्यावर पडलेल्या धाडींवरून राणेंनी शिवसेनेला उलट सवाल केले. महाराष्ट्राला मुख्यमंत्रीच नसल्याचं मला वाटतं, असंही राणे यावेळी म्हणाले. माध्यमांशी बोलताना राणे म्हणाले, “महाराष्ट्रात राजकीय घडामोडी सुरू आहेत. उत्सव सुरू आहे. स्वागत सुरू […]

Mumbaitak
follow google news

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यावर हल्ला चढवला. राज्यावरील वीज टंचाईचं संकट, एसटी कर्मचाऱ्यांचा संप, यशवंत जाधव यांच्यावर पडलेल्या धाडींवरून राणेंनी शिवसेनेला उलट सवाल केले. महाराष्ट्राला मुख्यमंत्रीच नसल्याचं मला वाटतं, असंही राणे यावेळी म्हणाले.

हे वाचलं का?

माध्यमांशी बोलताना राणे म्हणाले, “महाराष्ट्रात राजकीय घडामोडी सुरू आहेत. उत्सव सुरू आहे. स्वागत सुरू आहे. स्वागत आणि उत्सव ज्या कारणासाठी होतोय, ते ऐकून आणि पाहून महाराष्ट्र कुठे चाललाय असा प्रश्न जनतेला पडत असेल. महाराष्ट्र देशातील प्रगत राज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन प्रत्येक मुख्यमंत्री काम करतात. याला आताच सरकार अपवाद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन कमाई करावी. पैसा मिळवावा म्हणून या सरकारमधील काही मंडळी प्रयत्न करत आहेत,” अशी टीका नारायण राणेंनी केली.

“काल दोन दिवसाच्या पत्रकार परिषदेच्या बातम्या मी पाहिल्या. पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत यांनी विचार मांडले, ते पाहता महाराष्ट्राची किंवा देशाची या प्रकारे पत्रकार परिषदेत भाषा वापरली. शिव्या घातल्या. ही महाराष्ट्राची आणि देशाची संस्कृती नाही. संपादक पदावरील व्यक्तीने ज्या शिव्या घातल्या त्या मी उच्चारू इच्छित नाही. ज्या शिव्या घातल्या त्यावरून त्या माणसाचंच नाही, तर त्या वृत्तपत्राचा दर्जा काय असेल, काय आहे हे जनतेला माहिती आहे,” असं म्हणत राणेंनी संजय राऊतांवर निशाणा साधला.

“पत्रकारितेचं पावित्र्य सामना ठेवतो की नाही माहिती नाही. पत्रकारिता पेशा आहे धंदा नाही. किरीट सोमय्यांना सामनातून चोर म्हटलं आहे. धमकी न देता, धमकीच्या केसेस महाराष्ट्रात घेतल्या जात आहे. चाळीस बसेस सोडून कोणती जनता रस्त्यावर उरली होती. शिवसेना कुणाला घाबरत नाही म्हणता, पण तुम्ही कधी शिवसैनिक होतात. संपादक म्हणून आलात. ईडी स्वतंत्र आहे. ते त्यांचं काम करत आहेत. भ्रमिष्ट झालेली माणसं अशी बोलतात. तसाच प्रकार संजय राऊतांचा आहे. आपण कोणत्या पक्षात आहोत. पक्षाचे संस्थापक कोण होते. त्यांचे विचार काय होते? माध्यमांचा टीआरपी वाढतोय, पण शिवसेनेचा टीआरपी खाली जातोय. याचं कारण संजय राऊत,” असंही राणे यावेळी म्हणाले.

“महाराष्ट्रात गुन्हा घडला की, त्याच्या समर्थनार्थ आंदोलनं होताहेत. माध्यमांचा धर्म वेगळा आहे. अनेक वृत्तपत्रांनी समर्थनार्थ लेख लिहिले. भविष्यात ते खासदार होतील. माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना. विक्रांतसाठी पैसे जमवले. भ्रष्टाचार झाला म्हणत आहेत. ५७ कोटींचा आकडा कुठून आणला. ५६ वर्ष यांनी वर्गणी गोळा केली. कुणाला हिशोब दिला. संजय राऊत सांगा, किती गुन्हे दाखल होतील? हे राज्य चालवण्यास असमर्थ आहेत. राज्यात विजेचा तुटवडा होण्याची शक्यता आहे. यांच्या काहीच उपाययोजना नाही,” असं राणे म्हणाले.

“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना लोडशेडिंग, वीज तुटवडा नव्हता. आता का झालं. कारण कारभार. भ्रष्टाचार. विजेची चोरी. अनेक गोष्टी आहेत. हा भुर्दंड जनतेवर येणार. अंधारात जनतेला राहावं लागणार. फडणवीस मुख्यमंत्री असताना ४५ लाख शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा करण्यात आला, तरीही तिन्ही कंपन्या मिळून ४ हजार ७१७ कोटी रुपये फायद्यात होतं,” असं राणेंनी सांगितलं.

“कोळसा कंपन्या केंद्र सरकारच्या असून, कोळसा दिल्या जात नाही. असं हे लोक सांगतात. कोळसा कंपन्यांची ८०० कोटींची थकबाकी महाराष्ट्राने दिलेली नाही, हे सांगत नाही. महाराष्ट्र सरकारने वीज मंडळाची १८ हजार कोटींची रक्कम थकित आहे. ती दिली तरी वीज कंपन्या सावरतील. अर्थ खाते पैसे देत नाही. का दिले जात नाही पैसे?,” असा प्रश्न राणेंनी उपस्थित केला.

“महसूली तूट २४ हजार कोटींची आहे. राजकोषीय तूट ८९ हजार कोटींची. देऊ म्हणतात पण मिळत नाही. बनवाबनवीचा अर्थसंकल्प आहे. तिजोरीतच काही नाही. मी समजतो या राज्याला मुख्यमंत्री नाही. विनामुख्यमंत्र्यांचं राज्य. गेल्या सव्वा दोन अडीच वर्षात मंत्रालयात कुणी नाही. मंत्रिमंडळ बैठकीत नाही. सभागृहात कधीतरी महिन्यातून. तोंड दाखवायचं आणि जायचं,” असं सांगत राणेंनी थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

“सभागृहात भाषण केलं. याला टोमणे, त्याला टोमणे. विकासावर बोला. राज्य कसं चालवणार आहे हे जनतेला सांगा. काही तरी आश्वासनं द्या. अर्थमंत्र्यांनी बजेट सांगितलं. राज्य चालवू शकत नाही. कायदा सुव्यवस्था सांभाळू शकत नाही. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करू शकत नाही. न्यायालयाने आदेश देऊनही परिवहन मंत्र्यांनी दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन कामगारांना दमदाटी केली. कामगार चवताळले तर काय करू शकतात, याचं उदाहरण तुम्ही बघितलं आहे. हे मलाही अपेक्षित नाही. राज्यकर्त्यांनी कर्मचाऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. त्यांच्या मुलाबाळांनी काय करायचं,” असा सवाल राणेंनी केला.

“महापालिकेत आयकरची धाड पडली. स्थायी समितीचे अध्यक्ष जाधव. किती पैसे मिळाले. स्थायी समितीच्या अध्यक्षांनी पैसे खाल्ले, ते कुणाचे आहेत. मुंबईच्या जनतेनं कर भरले. त्या पैशातून टेंडर निघाली. त्यातील १५ टक्के. लोकांनी कर भरले नाहीत, तर नोटीस. पाणी बंद. लाईट बंद. ते पैसे यांनी खाल्ले. कुणी काहीच बोलत नाही. पक्षप्रमुख, मुख्यमंत्री, नेते कुणीच काही बोलत नाही. यशवंत जाधवांवर चुकीची धाड टाकली म्हणून आंदोलन होईल. कारण शिवसेनेचा पैसा खाणे हा धर्म आहे,” अशी टीका राणेंनी शिवसेनेवर केली.

“संजय राऊतांना काही तारतम्य नाही. शुद्धीवर असलेला माणूस असं बोलू शकत नाही. अवकाळी पावसाचे पैसे अजून दिले नाहीत. जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून संजय राऊतांना सोडलंय. उलट्या सुलट्या उड्या मारा आणि डान्स करा. लोक ते बघतील,” असा टोला राणेंनी राऊतांना लगावला.

    follow whatsapp