चिपळूण: ‘मी काय नॉर्मल माणूस आहे का? आमचं देखील सरकार वर आहे. त्यामुळे पाहू शिवसेनेची उडी कुठपर्यंत आहे ते.’ अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी राणेविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी त्यांना अटक करण्याचे आदेश बजावले आहेत. याचबाबत प्रतिक्रिया देताना नारायण राणेंनी आपला संताप व्यक्त केला. यावेळी त्यांनी माध्यमांवर देखील या सगळ्याचं खापर फोडलं.
ADVERTISEMENT
‘वर आमचं पण सरकार आहे, बघू शिवसेना कुठपर्यंत उडी मारते…’
नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर याप्रकरणी राणेंना अटक करण्यासाठी नाशिक पोलिसांचं पथक देखील रवाना झालं आहे. याच सगळ्याबाबत नारायण राणे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मी कुठलाही गुन्हा केलेला नाही. मी फक्त माहितीच्या आधारे बोलतो. माझ्याविरोधात अद्याप तरी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. तशी माहिती मला देण्यात आली नाही. मी पाहतोय सकाळपासून सर्व माध्यमं ही, माझ्यावर गुन्हा दाखल, अटक होणार, पथक निघालं अशा बातम्या चालवत आहे. त्यामुळे माझं तुम्हाला सांगणं आहे की, माझी बदनामी करणाऱ्या गोष्टी चालवल्या तर सर्वात आधी तुमच्याविरोधात केस दाखल होईल.’
‘अरे हे काय चालवलं आहे… मी काय नॉर्मल माणूस आहे का? तुम्ही म्हणता मी गुन्हा केला. अरे जेव्हा आमचे प्रसाद लाड म्हणाले होते की, शिवसेना भवन तोडू. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, थोबाड फोडू… तेव्हा का मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल झाला नाही?’
‘मी काल काय म्हणलो… जर मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असते. मी असं म्हटलं नाही की, मी जाऊन त्यांच्या कानाखाली लगावेल असं म्हटलं असतं तर गुन्हा झाला असता. मला देखील सगळे नियम आहे कायदे माहिती आहेत. त्यामुळे मला माहिती आहे की, नेमकं काय बोललो आहे ते. अरे मुख्यमंत्र्याना देशाचा अमृत महोत्सव माहिती नाही ही लज्जास्पद बाब आहे.’
‘अरे मी केंद्रीय मंत्री आहे. केंद्रीय मंत्र्याला अटक करता येतं का? पोलीस आयुक्त काय बोलतात… ते काय राष्ट्रपती आहेत की, पंतप्रधान? मी बोललो तो काही फौजदारी गुन्हा (Criminal Offenses) नाही. पोलीस आयुक्त हे एवढी तत्परता फक्त त्यांना वरुन आलेल्या आदेशामुळे दाखवत आहेत. पण आमचं सुद्धा सरकार वर आहे. त्यामुळे पाहू शिवसेनेची उडी कुठपर्यंत आहे ते.’
‘आमचा जन आशीर्वाद कार्यक्रम हा ठरल्याप्रमाणेच होणार आहे. शिवसेनेत आता काही दम राहिलेला नाही. ते कसले आक्रमक… मी त्यांच्याहून डबल आक्रमक आहे. आता यांनी दगडफेक केली. यात काय पुरषार्थ आहे… उद्या समजा आमचं कोणी यांच्या घरापर्यंत गेलं मग? नारायण राणे गेले तेव्हाच शिवसेना संपली. गुन्हा कुठे होतो आणि कुठे नाही ते मला माहित आहे. त्यामुळे मी या शिवसैनिकांना भीक घालत नाही.’ अशी प्रतिक्रिया नारायण राणेंनी यावेळी दिली आहे.
Shiv Sena vs Rane: कोंबडी चोर म्हणत शिवसैनिकांची राणेंवर टीका, दादरमध्ये भलं मोठं बॅनर
नारायण राणे यांना अटक करा, नाशिक पोलीस आयुक्तांचे आदेश
नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्याविरोधात महाड आणि नाशिक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आता नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी नारायण राणे यांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत.
नाशिकमधील शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांनी नाशिक पोलिसात नारायण राणेंविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.
Narayan Rane: ‘नारायण राणेंना अटक करा…’, नाशिकच्या पोलीस आयुक्तांकडून आदेश जारी
सध्या नारायण राणे हे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये आहेत. इथून त्यांनी आपली जन आशीर्वाद यात्रा सुरु ठेवली आहे. पण आता नाशिक पोलिसांचं एक पथक त्यांना अटक करण्यासाठी चिपळूणच्या दिशेने रवाना झालं आहे.
ADVERTISEMENT