केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात राणे विरुद्ध शिवसेना यांच्यात संघर्षाचा भडका उडाला आहे. राज्यभर तीव्र पडसाद उमटले असून, शिवसेनेचे नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी राणेंनी महाराष्ट्राची माफी मागवी, असं म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
एकनाथ शिंदे काय म्हणालेत?
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत वक्तव्य केलं, ते अतिशय संतापजनक आणि निंदनीय आहे. महाराष्ट्राला थोर आणि मोठी परंपरा आहे. आतापर्यंत आधी कुणीही कधीही अशाप्रकारचं वक्तव्य केलेलं नाही आणि महाराष्ट्राच्या परंपरेला न शोभणार हे वक्तव्य आहे’, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
‘नारायण राणे यांच्या वक्तव्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. सध्या राज्यातील कोविडची परिस्थिती लक्षात घेता व वाद अधिक चिघळू न देता केलेलं वक्तव्य दुरुस्त करून या महाराष्ट्राची माफी मागावी’, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
नारायण राणे मुख्यमंत्र्यांबद्दल काय म्हणाले होते?
पत्रकार परिषदेत बोलताना राणे म्हणाले होते की, ‘या माणसाकडे कोणतीही उपाययोजना नाही. काही झालं की, लॉकडाउनची भीती दाखवली जाते. महाराष्ट्रात आज व्यापाऱ्यांची परिस्थिती गंभीर आहे. आर्थिक फटका बसल्यामुळे ते १० वर्ष माना वर काढू शकत नाही. आरोग्य विभागाची अवस्था भयावह आहे. स्टाफ नाही, डॉक्टर नाही, लसी नाहीत अशी गंभीर परिस्थिती राज्यात आहे,’ अशा शब्दात राणेंनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता.
त्यानंतर पुढे बोलताना ते असं म्हणाले, ‘या मुख्यमंत्र्यांना देशाचा हीरक महोत्सव आहे की, अमृत महोत्सव हे माहिती नाही. १५ ऑगस्टला राज्यातील जनतेला उद्देशून भाषण करत असताना उद्धव ठाकरे मागे उभ्या असलेल्या मुख्य सचिवांना विचारतात हीरक महोत्सव आहे ना?; मी त्या जागी असतो, तर कानाखाली चढवली असती. आपल्या देशाच्या स्वातंत्र्याविषयी मुख्यमंत्र्यांना माहिती नसावी हे किती चीड आणणारी गोष्ट आहे’, असं विधान राणेंनी केलं होतं.
राणे-शिवसेना संघर्षाची भाजपला झळ
नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करताना मी असतो, तर कानाखाली चढवली असती, असं म्हटलं होतं. या विधानाचे मंगळवारी महाराष्ट्रभर पडसाद उमटले. नारायण राणे यांच्या जुहूतील बंगल्यासमोर प्रचंड राडा झाला. शिवसेनेकडून संतप्त प्रतिक्रिया उमटली असून, राणे विरुद्ध शिवसेना संघर्षांचा भाजपला फटका बसला आहे.
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर भाजप कार्यालयांना लक्ष्य केलं. भाजप कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. तर काही ठिकाणी नारायण राणेंसह भाजपच्या नेत्यांच्या होर्डिग्जची नासधूस करण्यात आली आहे.
शिवसेनेकडून भाजप कार्यालयावर होत असलेल्या हल्ल्यांबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही टीका केली आहे. दरम्यान, राज्यभर शिवसैनिकांनी आपला रोष व्यक्त केला असून, अनेक ठिकाणी रस्त्यावर प्रतिकात्मक पुतळे जाळले. तर काही ठिकाणी राणे यांच्या फोटोला जोडे मारुन निषेध केला.
ADVERTISEMENT