Narayan Rane: ‘आपल्याच वहिनीवर Acid फेकायला कोणी सांगितलं हे माहितीय’, राणेंचं गंभीर वक्तव्य

मुंबई तक

• 08:48 AM • 27 Aug 2021

रत्नागिरी: ‘माझा घसा ठीक होऊ दे.. मग यांना सोडणार नाही. काय करायचं ते करा. आम्हालाही जुन्या गोष्टी माहित आहेत. आपल्याच बंधूच्या पत्नीवर म्हणजे वहिनीवर अॅसिड फेकायला कुणी सांगितलं कोणाला.. हे सगळं मी टप्प्याटप्प्याने बाहेर काढणार आहे.’ असं गंभीर वक्तव्य नारायण राणे (Narayan Rane) यांनी केलं आहे. त्यामुळे आता त्यांच्या या वक्तव्याचे काय पडसाद उमटतात हे […]

Mumbaitak
follow google news

रत्नागिरी: ‘माझा घसा ठीक होऊ दे.. मग यांना सोडणार नाही. काय करायचं ते करा. आम्हालाही जुन्या गोष्टी माहित आहेत. आपल्याच बंधूच्या पत्नीवर म्हणजे वहिनीवर अॅसिड फेकायला कुणी सांगितलं कोणाला.. हे सगळं मी टप्प्याटप्प्याने बाहेर काढणार आहे.’ असं गंभीर वक्तव्य नारायण राणे (Narayan Rane) यांनी केलं आहे. त्यामुळे आता त्यांच्या या वक्तव्याचे काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार.

हे वाचलं का?

जन आशीर्वाद यात्रेला रत्नागिरीतून पुन्हा सुरुवात झाल्यानंतर राणेंनी आज (27 ऑगस्ट) एका सभेत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता गंभीर आरोप केले आहेत. ‘मी देखील 39 वर्ष आपल्यासोबत होतो. त्यामुळे मला बऱ्याच गोष्टी माहिती आहेत.’ असं म्हणत नारायण राणे यांनी अनेक या भाषणात शिवसेनेला अनेकदा आव्हान दिलं आहे.

पाहा नारायण राणे आपल्या भाषणात नेमकं काय म्हणाले?

‘माझा घसा ठीक होऊ दे.. मग यांना सोडणार नाही. काय करायचं ते करा. आता जुन्या गोष्टी काढल्या.. काढा ना.. गेल्या दोन वर्षांपासून शोधतायेत हे लोकं.. आम्हालाही जुन्या गोष्टी माहित आहेत. रमेश मोरेची हत्या कशी झाली. त्याचं कारण काय आहे. ज्या जाधव यांची हत्या झाली त्याचं कारण काय आहे.’

‘आपल्याच बंधूच्या पत्नीवर म्हणजे वहिनीवर अॅसिड फेकायला कुणी सांगितलं कोणाला.. असे यांचे संस्कार… आपल्याच भावाच्या पत्नीवर अॅसिड फेकायचं.. हे सगळं मी टप्प्याटप्प्याने मी काढणार. सुशांत सिंहची केस संपलेली नाही, दिशा सालियनची पण केस संपलेली नाही.’

Narayan Rane आणि शिवसेना या संघर्षापेक्षाही नाईक विरूद्ध राणे संघर्ष का होता चर्चेत?

‘मी केंद्रात मंत्री आहे. जरा आठवण करा.. माझ्यावर निर्बंध.. माझ्यावर निर्बंध ठेवून काय करणार? अटक… किती दिवस?.. सगळा कायदा तुमच्याकडेच नाही. आम्ही भारतीय नागरिक आहोत. तुम्हाला जो कायदा तो आम्हालाही आहे. उगाच दादागिरी करु नका. तो तुमचा पिंड नाही. आम्हाला अनुभवलं आहे. जवळून पाहिलंय. उगाच वाटेला जाऊ नका. त्यामुळे मी आज ना उद्या.. परत माझा आवाज खणखणीत झाल्यावर.. मी खणखणीत वाजवेन.. वाजवेन म्हणजे ढोलकी पण वाजवू शकतो.. असं काही नाही.’ असं म्हणत राणेंनी पुन्हा एकदा शिवसेनेला आव्हान दिलं आहे.

‘जो आमच्या घरावर येईल त्याला सोडणार नाही’

‘पुढच्या वेळेला सगळे माजी आमदार हे आजी-आजी होणार.. ते आता करायचं जिद्दीने. शिवसेना कुठे औषधालाही सापडता कामा नये. याची काळजी घ्यायची आहे. अरे आमच्या घरासमोर कोण तो देसाई आला.. हा.. वरुण.. वरुन खाली आला तो. सरदेसाई.’

‘आमच्या घरावर हल्ला करतो त्याला अटक नाही. नातलग आहे ना.. त्यामुळे त्याची एवढी वट. अहो ज्याला पोलीस बंदोबस्त नाही त्यांनी मार खाल्ला. पण आता लक्षात ठेवा. पुन्हा आलात तर परत जाणार नाहीत. आमच्या घरावर कोणीही येईल त्याला आम्ही सोडणार नाही.’ असं म्हणत नारायण राणेंनी युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांना आव्हान दिलं आहे.

    follow whatsapp