नागपूर : विधानपरिषदेच्या निवडणुकीत नाशिक पदवीधर मतदारसंघात शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी उमेदवारी दाखल न करता त्यांचे पुत्र काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. तसंच आपण भाजप आणि इतर पक्षांना पाठिंब्यासाठी विनंती करणार असल्याचंही सत्यजीत तांबे यांनी सांगितलं. मात्र या सगळ्या प्रकारामुळे राज्यातील काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे हे निश्चित.
ADVERTISEMENT
दरम्यान, या सगळ्या प्रकरणामागे भाजपही असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपला आज दुसऱ्यांचे घर फोडताना आनंद होत आहे. पण त्यांचे घर फुटेल तेव्हा त्यांना याच दुःख कळेल, असं म्हणतं निशाणा साधला. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही मदत मागितली तर विचार करु, असं म्हणतं सेफ उत्तर दिलं आणि यामागे भाजप नसल्याचं स्पष्ट केलं.
तर दुसऱ्या बाजूला या सगळ्यामागे देवेंद्र फडणवीस यांचं धक्कातंत्र असल्याचंही बोललं गेलं. आता यावर खुद्द फडणवीस यांनीच उत्तर दिलं आहे. पुण्यात माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, आमचं धोरण बावनकुळे यांनी सांगितलं आहे. सत्यजित तांबे यांचं काम चांगलं आहे. ते युवा नेता म्हणून निश्चित चांगले आहेत. पण कोणताही निर्णय धोरणात्मक घ्यायचा असतो.
यामागे तुमचं धक्कातंत्र आहे का? तुम्ही जुळवून आणलेला हा खेळ आहे का? यावर बोलताना फडणवीस म्हणाले, आम्ही कोणतंही गणित घडवलेले नाही. मी त्यांच्या पुस्तक प्रकाशनाला गेलो होतो, पण सगळेच नेते तिथं होते. त्यामुळं हा घटनाक्रम चुकीच्या पद्धतीने जोडू नये. योग्यवेळी सगळं समोर येईल. उमेदवार कोण द्यायचा यावर चर्चा सुरू होती. राजेंद्र विखे पाटील यांनी उमेदवारी घ्यावी असं आमचं मत होतं पण ऐनवेळी त्यांनी उमेदवारी घेण्यास असर्थता दर्शविली, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
ADVERTISEMENT