नाशिक : …तर आमची गावं गुजरातमध्ये विलीन करा; सुरगाणा राष्ट्रवादी तालुकाध्यक्षांची मागणी

मुंबई तक

• 04:39 PM • 01 Dec 2022

प्रविण ठाकरे : नाशिक : जत, अक्कलकोट, धर्माबादपाठोपाठ आता नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातून देखील महाराष्ट्रातून बाहेर पडण्याची मागणी समोर आली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष उलटूनही सुरगाणा तालुक्यातील अनेक गाव व पाडे सुख सुविधांपासून वंचित आहेत. ग्रामीण भागातील गावांचा विकास करता येत नसेल तर ही सर्व गावे गुजरातमध्ये विलिन करा, अशी मागणी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष […]

Mumbaitak
follow google news

प्रविण ठाकरे :

हे वाचलं का?

नाशिक : जत, अक्कलकोट, धर्माबादपाठोपाठ आता नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातून देखील महाराष्ट्रातून बाहेर पडण्याची मागणी समोर आली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष उलटूनही सुरगाणा तालुक्यातील अनेक गाव व पाडे सुख सुविधांपासून वंचित आहेत. ग्रामीण भागातील गावांचा विकास करता येत नसेल तर ही सर्व गावे गुजरातमध्ये विलिन करा, अशी मागणी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष चिंतामण गावित यांनी केली. या मागणीचे लेखी निवेदन गुरुवारी गावित यांनी गावकऱ्यांसह तहसीलदर सचिन मुळीक यांना दिले.

गुजरात राज्यातील सीमावर्ती भागात, महाराष्ट्रातील सीमावर्ती भागात मिळणाऱ्या सुखसुविधांमध्ये आणि विकासकामांमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. गुजरातमधील सीमावर्ती भागातील रस्ते, आरोग्य सेवा, पाणी, दळणवळण, वीजपुरवठा या नागरिकांना मिळणाऱ्या सर्व सुविधा सुस्थितीत आहेत. तर सुरगाणा तालुक्यातील रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली असून गेल्या काही वर्षांत वीजपुरवठा मिळालेला नाही, अशी खंत गावित यांनी व्यक्त केली.

दरवर्षी पाणी टंचाई निर्माण होते. सिंचन प्रकल्प नाही. त्यामुळे शेती केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. काही वर्षांपासून मजुरीसाठी होणारे स्थलांतर अद्याप थांबलेले नाही. अर्थात जो सर्वांगिण विकास व्हायला पाहिजे होता तो विकास मागील काही वर्षात झाला नाही. समस्या सुटत नसल्याने आणि आपल्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी गावकऱ्यांनी गावचा समावेश गुजरातमध्ये करावा, अशी मागणी केल्याचं गावित म्हणाले.

जत, अक्कलकोट, धर्माबादचीही मागणी :

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील, सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील अनेक गावांनी कर्नाटकमध्ये जाण्यासाठी तर नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यांनी अनेक गावांनी तेलंगाणात जाण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्रात सीमावर्ती भागात सरकारचं दुर्लक्ष झालं असून पाणी आणि मुलभूत सोयी-सुविधा मिळत नसल्याचा आरोप या गावांतील नागरिकांनी केला आहे.

    follow whatsapp