नाशिक : विधानपरिषद निवडणुकीत अर्ज भरण्याच्या अखेरच्या एका तासात नाशिक पदवीधर मतदारसंघात हायव्होल्टेज ड्रामा घडला. अगदी शेवटच्या क्षणी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी माघार घेतली आणि त्यांचेच पुत्र सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. इतकचं नाही तर सुधीर तांबे यांनी काँग्रेसतर्फे सत्यजित तांबे यांना पाठिंबाही जाहीर केला.
ADVERTISEMENT
या निवडणुकीत दुसरा सस्पेन्स भाजपने ठेवला. अखेरच्या क्षणापर्यंत भाजपने नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी त्यांचा अधिकृत उमेदवार जाहीर केला नाही. त्यामुळे आता भाजप सत्यजित तांबेंना पाठिंबा जाहीर करणार आहे का? याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. अशात भाजपचे नेते आणि अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सत्यजित तांबे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
पुण्यात बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये पक्षश्रेष्ठी निर्णय करत असतात. जो उमेदवार येईल त्यासाठी आम्ही काम करणार आहोत. भाजपची भूमिका स्वीकारुन जो उमेदवार काम करेल त्यांच्यासाठी आम्ही आहोत. तसंच भाजप सत्यजित तांबेंना पाठिंबा देणार असल्याची चर्चा आहे, यावर बोलताना विखे पाटील म्हणाले, सत्यजितशी माझं अद्याप बोलणं झालेलं नाही. पण पक्षाने जर त्यांना पाठिंबा जाहीर केला तर आम्ही त्यांच्यासाठीही काम करु.
दरम्यान, सत्यजित तांबे अर्ज भरणार याबद्दल मागील अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होत्या. मात्र ते काँग्रेसकडून भरणार की भाजपकडून भरणार याबद्दल सस्पेन्स कायम होता. दोन्ही पक्षांनी अखेरच्या दिवसांपर्यंत इथून उमेदवार घोषित न केल्याने हा सस्पेन्स वाढला होता. अखेर आज सकाळी काँग्रेसकडून डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली. तर भाजपकडून अधिकृत उमेदवारच देण्यात आला नाही. अशात सुधीर तांबे यांनी अखेरच्या क्षणी माघार घेत सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे.
ADVERTISEMENT