मुंबई: भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य करणं हे भोवण्याची अधिक शक्यता आहे. राणेंनी केलेल्या वक्तव्यानंतर नाशिकचे शिवसेनेचे नेते सुधाकर बडगुजर यांनी नाशिक पोलिसात तक्रार केल्यानंतर सायबर सेलने नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.
ADVERTISEMENT
दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी थेट नारायण राणे यांच्या अटकेचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता हे संपूर्ण प्रकरण अधिक चिघळण्याची शक्यता आहे. पोलीस आयुक्तांनी दिलेल्या आपल्या निर्देशात असं म्हटलं आहे की, राणेंना अटक करुन त्यांना कोर्टासमोर हजर करण्यात यावं.
पाहा नाशिकचे पोलीस आयुक्त यांनी नारायण राणेंना अटक करण्याच्या निर्देशपत्रात काय म्हटलंय?
1. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाड येथील पत्रकार परिषदेत शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बदनामीकारक, द्वेषभाव निर्माण करणारी विधाने करुन समाजामध्ये शत्रुत्वाची व द्वेषाची भावना निर्माण होईल असे विधान केलेले आहे.
2. सदर गुन्ह्यातील आरोपी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या महाड येथील विधानामुळे महाराष्ट्रातील तसेच नाशिक शहरातील विविध गटातील सदस्य व व्यक्तींमध्ये तेढ निर्माण होईल, शत्रुत्व व दुष्टपणाची भावना निर्माण होईल आणि या विधानांमुळे सामान्य नागरिक मा. मुख्यमंत्री हे कुठलेही काम करत असताना जर त्यांचे सचिवांना काहीही विचारले, तर सामान्य नागरिक त्यांच्यावर बलप्रयोग करण्यास प्रवृत्त होतील अशी दाट शक्यता नाकारता येत नाही.
3. सदर गुन्ह्यात आरोपी भारत सरकारचे मंत्री असून त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांच्याविरोधात विधान केलेले आहे. गुन्ह्याची गंभीर व्यापकता लक्षात घेता. नारायण राणे यांना तात्काळ अटक करुन मा. न्यायलयासमोर उपस्थित करणे आवश्यक असल्याने एक पोलीस उपायुक्त दर्जाचा अधिकारी नेमणे उपयुक्त वाटते. संजय बारकुंड पोलीस उपआयुक्त नाशिक शहर यांनी एक चमू तयार करुन मा. मंत्री नारायण राणे यांना अटक करुन कोर्टासमोर उपस्थित करण्याची कार्यवाही करावी.
4. आरोपी हे राज्यसभेचे सदस्य असल्यामुळे संसदेच्या Rules of Procedure and Conduct of Business चे Rule 222 A प्रमाणे मा. चेअरमन व उपराष्ट्रपती यांना कळविणे बंधनकारक असल्यामुळे संजय बारकुंड यांनी तपास अधिकारी यांच्यामार्फतीने नारायण राणे यांच्या अटकेनंतर मा. उपराष्ट्रपती, भारत सरकार यांना त्यांच्या अटकेबाबत माहिती कळवावी. तसेच या अटकेची माहिती इंन्टेलीजन्स ब्युरो, भारत सरकार, एसआयडी कमिशनर, महाराष्ट्र शासन व संबधित जिल्हा दंडाधिकारी व न्यायदंडाधिकारी यांना द्यावी.
दरम्यान, राणेंविरोधात एवढ्या तात्काळ अटकेचे आदेश काढण्यात आल्याने अनेकांनी आश्चर्यही व्यक्त केलं आहे.
Shiv Sena vs Rane: कोंबडी चोर म्हणत शिवसैनिकांची राणेंवर टीका, दादरमध्ये भलं मोठं बॅनर
नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांबाबत नेमकं काय वक्तव्य केलं होतं?
‘या माणसाकडे कोणतीही उपाययोजना नाही. काही झालं की, लॉकडाउनची भीती दाखवली जाते. महाराष्ट्रात आज व्यापाऱ्यांची हालत गंभीर आहे. आर्थिक फटका बसल्यामुळे ते 10 वर्ष माना वर काढू शकत नाही. आरोग्य विभागाची अवस्था भयावह आहे. स्टाफ नाही, डॉक्टर नाही, लस नाही अशी गंभीर परिस्थिती राज्यात आहे.’ असं म्हणत राणेंनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता.
त्यानंतर पुढे ते असं म्हणाले की, ‘या मुख्यमंत्र्यांना देशाचा हिरक महोत्सव आहे की अमृत महोत्सव हेच माहिती नाही. 15 ऑगस्टला राज्यातील जनतेला उद्देशून भाषण करत असताना उद्धव ठाकरे मागे उभे असलेल्या मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना विचारतात हिरक महोत्सव आहे ना? मी त्या जागी असतो तर कानाखाली चढवली असती. आपल्या देशाच्या स्वातंत्र्याविषयी मुख्यमंत्र्यांना माहिती नसावी हे किती चीड आणणारी गोष्ट आहे.’ असं वक्तव्य राणेंनी महाडमध्ये केले होतं.
ADVERTISEMENT