– प्रवीण ठाकरे, नाशिक प्रतिनिधी
ADVERTISEMENT
२६ जानेवारी रोजी नाशिकच्या विल्होळीनजीक जळालेल्या अवस्थेत आढळून आलेल्या सांगाड्यामुळे खळबळ उडाली होती. हा सांगाडा बेपत्ता डॉक्टर सुवर्णा वाजे यांचाच असल्याचं तपासात समोर आलं असून, कौटुंबिक वादातून सुवर्णा यांचे पती संदीप वाजे यांनीच त्यांची हत्या केल्याचं निष्पन्न झालं आहे.
पोलिसांनी आरोपी पती संदीप वाजे यांना अटक केली असून, या घटनेचा तपास अद्याप सुरु असल्याची माहिती नाशिक ग्रामीणचे पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी दिली.
नाशिक तालुका पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत आज सचिन पाटील यांनी आतापर्यंतच्या तपासाची माहिती दिली. गेल्या अनेक वर्षांपासून डॉ. वाजे यांच्या घरात कौटुंबिक वाद सुरु होते. या वादाच्या अनेक ठिकाणी नोंदी झाल्या असून याच वादातून पती संदीप वाजे यांनी हत्या केल्याचं कळतंय.
पुण्याहून गोव्याकडे निघालेली बस जळून खाक, 37 प्रवासी बालंबाल बचावले
डीएनए रिपोर्ट आल्यानंतर नाशिक पोलिसांनी कसून तपासाला सुरुवात केली. २ फेब्रुवारीला पोलिसांनी संदीप वाजे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. बराच वेळ चाललेल्या चौकशीनंतर या प्रकरणात संदीप वाजेचा सहभाग निष्पन्न झाला. या प्रकरणात आणखीही काही संशयित आहेत, मात्र त्यांची नाव आताच उघड करणार नसल्याचं पोलिसांनी सांगितलं.
ठेकेदार असलेल्या संदीप वाजेसोबत या गुन्ह्यात आणखी कोणी सहभागी होतं का याबाबत मात्र अद्याप स्पष्ट माहिती पोलिसांनी दिली नाही. या हत्येमागे कोणतेही राजकीय कारण नसून पोलीस या कटात आणखी कोण सहभागी होतं आणि हत्येमागचं मुळ कारण काय याचा लवकरात लवकर शोध घेतील अशी माहिती अधिक्षक सचिन पाटील यांनी दिली.
काय आहे प्रकरण?
महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे या २५ जानेवारी रोजी मोरवाडी हॉस्पिटलमध्ये कामावर गेल्या होत्या. रात्री कामावरून त्या निघाल्याही होत्या. दरम्यान, वाडीवाऱ्हे पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील रायगड नगर जवळ रस्त्याच्या कडेला चारचाकी वाहनामध्ये पूर्णत: जळालेल्या अवस्थेत सांगाडाआढळून आला होता.
रात्री उशीर झाल्याने पती संदीप वाजे यांनी नातेवाइकांकडे विचारपूस केली. परंतु त्या न परतल्याने त्यांनी मध्यरात्री अंबड पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.
जळालेली कार ही वाजे यांचीच असल्याचे चेसीज नंबरच्या मदतीने पोलिसांनी स्पष्ट केले. डॉ. वाजे यांचे वाहन आढळलेल्या ठिकाणापर्यंत जाणाऱ्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज व मोबाईलचे लोकेशन ट्रॅक केले जात होते.
सिडकाेतील स्टेट बँक व अन्य वेगवेगळ्या भागातील सीसीटीव्हींसह वाडीवऱ्हेच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील सीसीटीव्हीचे फुटेज मिळवून डॉ. सुवर्णा यांच्या मोबाईलच्या लोकेशनचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले होते.
ADVERTISEMENT