मुंबई: महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना 20 जून रोजी होणाऱ्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी मिळावी यासाठी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे हा महाविकास आघाडीला मोठा धक्का मानला जात आहे. कारण महाविकास आघाडीला दोन मतांचा फटका बसला आहे. महाविकास आघाडीचे दोन मतदार कमी झाल्याने भाजपला याचा फायदा होणार आहे.
ADVERTISEMENT
नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठीही याचिका दाखल केली होती परंतु, न्यायालयाने ती याचिका फेटाळली होती. आता विधान परिषदेलाही राष्ट्रवादीच्या या दोन आमदारांना मतदान करत येणार नाहीये. त्यामुळे महाविकास आघाडीला हा धक्का मानला जात आहे. आता या दोघांची याचिका फेटाळल्यानंतर राजकीय नेत्यांची प्रतिक्रिया येत आहेत.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. न्यायालयाच्या खांद्यावर बंदूक ठेवून धक्के कोण देतंय हे सगळ्यांना माहिती आहे. त्यांना शिक्षा ठोठावण्यात आलेली नाही, गुन्हा सिद्ध झालेला नाही. त्यांना बेकायदेशररित्या जेलमध्ये डांबून ठेवण्यात आलेले आहे. त्यांना राज्यसभा आणि विधान परिषदेसाठी मतदान करण्याचा लोकशाहीने अधिकार दिलेला आहे. संसदीय लोकशाहीला टाळे लावण्याची वेळ आलेली आहे असे म्हणत संजय राऊतांनी कोर्टाच्या निर्णयावरती प्रश्नचिन्ह उपस्थीत केले आहेत.
नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदानाचा अधिकार नाकारणे म्हणजे लोकशाहीवर घाला आहे. संविधानाने त्यांना मतदानाचा अधिकार दिला आहे. कोर्टाच्या या निर्णयाचा आम्ही निषेध करतो असे वक्तव्य काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदारा भाई जगताप यांनी केले आहे.
ADVERTISEMENT