राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा समीर वानखेडे यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. महाराष्ट्राला बदनाम करण्याचं भाजपचं षडयंत्र असून, समीर वानखेडेंच्या माध्यमातून हे केलं जात असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरलाही उत्तर दिलं आहे.
ADVERTISEMENT
पत्रकार परिषदेत बोलताना मलिक म्हणाले, ‘मी आधीच सांगितलं होत की हे महाराष्ट्राला बदनाम करण्याचं षडयंत्र वानखेडेंच्या माध्यमातून होत आहे. हे प्रकरण रिया चक्रवर्तीपासून सुरू झालं. या प्रकरणात चित्रपटसृष्टीतील लोकांना एकापाठोपाठ एक बोलावण्यात आलं. एका वर्षाहून अधिक काळ झाला आहे. त्यात एकालाही अटक करण्यात आलेली नाही. तपास सुरूच आहे. जर एखाद्या घडनेत गडबड झालेली असेल तर अटक झाली पाहिजे. त्याच प्रकरणातून वसुलीचा धंदा सुरू आहे’, असा आरोप मलिक यांनी केला आहे.
वानखेडे कुटुंबाविरोधात नवाब मलिक यांचं घाणेरडं राजकारण, किरीट सोमय्यांचा आरोप
‘भाजपकडून हा कट केला जात आहे. महाराष्ट्रातील सरकार, महाराष्ट्रातील लोक आणि मुंबईतील बॉलिवूडला बदनाम करण्याचा हा प्रयत्न केला जात आहे. योगी महाराज नोएडात फिल्मसिटी बनवू इच्छितात. ताज हॉटेलमध्ये येऊन ते लोकांना भेटले. भाजपचे जे समर्थक आहेत, ते त्यांना भेटले होते. बॉलिवूडला बदनाम केल्यानं बॉलिवूड मुंबईतून बाहेर जाईल, असं त्यांना वाटतं. पण त्यांना हे माहिती नाही की, बॉलिवूड बनवायला दादासाहेब फाळके, व्ही. शांतारामपासून ते अनेक मराठी कलाकारांनी काम केलं. त्यांनी ओळख मिळवून दिली. बॉम्बे नाव असल्यानं त्याचं नाव बॉलिवूड असं करण्यात आलं. बॉलिवूड देशाची संस्कृती जगभरात घेऊन जातं. योगींना यूपीवूड तयार होईल असं वाटतं असेल, तर तो त्यांचा गैरसमज आहे’, असं मलिक म्हणाले.
‘उत्तर प्रदेशातील गंगेच्या काठावरील लोकांना, गुजरातमधून आलेल्या लोकांना आणि महाराष्ट्रातील लोकांनाही बॉलिवूडने नवी ओळख मिळवून दिली. मुंबई मिनी भारत आहे. पण त्याला बदनाम करून उत्तर प्रदेशात घेऊन जाण्याचं त्यांचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. मी क्रांती रेडकर यांना सांगू इच्छितो की आपण महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या लोकांच्या षडयंत्राचा आपण एक भाग आहात. तुमचे पती त्या कटाचे भाग आहेत. ते पूर्णपणे महाराष्ट्राला, महाराष्ट्रातील सरकारला बदनाम करत आहेत. महाराष्ट्राच्या नावावर आपण सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहात, पण तुम्हाला मदत मिळणार नाही’, असं उत्तर मलिक यांनी समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकरला दिलं.
पोपट पिंजऱ्यात बंद होणार असल्यानंच भाजपवाले घाबरलेत -नवाब मलिक
‘कुणाला भेटायचं हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. महाराष्ट्रात कुणी गुन्हा करत असेल आणि म्हणत असेल की, महाराष्ट्राचा रहिवाशी आहे म्हणून माफी मागत असेल, तर मला वाटतं न्यायासमोर जात, धर्म, प्रांत, भाषा चालत नाही. गुन्हेगार गुन्हेगारच असतो. ज्या पद्धतीने गोष्टी समोर येत आहेत, त्यावरून त्यांना शिक्षा मिळेल, असं आम्हाला वाटतं’, अशी भूमिका मलिक यांनी मांडली.
ADVERTISEMENT