राष्ट्रवादी काँग्रेसचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात आज बिनशर्त माफी मागितली आहे. NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव यांनी मलिकांविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा केला आहे. या खटल्यात हायकोर्टाने आदेश दिल्यानंतरही नवाब मलिकांनी वानखेडे परिवाराबद्दल वक्तव्य केल्यानंतर हायकोर्टाने मलिकांना तुमच्यावर कारवाई का केली जाऊ नये असं विचारलं होतं. ज्यानंतर मलिकांनी ही माफी मागितली आहे.
ADVERTISEMENT
“सर्वात आधी मी माननीय उच्च न्यायालयाची बिनशर्त माफी मागतो. २५ आणि २९ नोव्हेंबर रोजी दिलेल्या आदेशाचं माझ्याकडून उल्लंघन झालं आहे. माझा न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करण्याचा किंवा तो आदेश मोडण्याचा हेतू नव्हता”, असं मलिक यांनी कोर्टासमोर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तरं देत असताना कोर्टाच्या आदेशाचा माझ्याकडून भंग झाल्याचं मलिक यांनी कोर्टासमोर सांगितलं आहे.
समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर यांचा गुगल, फेसबुक आणि ट्विटरविरोधात दावा
मुलाखतीदरम्यान मी दिलेल्या मी दिलेल्या अशा कोणत्याही प्रतिक्रीया न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या कक्षेत येत नाहीत या विश्वासाने दिल्या आहेत. परंतू यानंतर मला देण्यात आलेल्या सल्ल्यानुसार, या खटल्यासंदर्भात मी केलेलं कोणतंही विधान किंवा मुलाखतीत दिलेली प्रतिक्रीया ही कोर्टाच्या आदेशाचा भंग करणारी आहे हे सांगण्यात आलं. त्यामुळे यापुढे मी अशा कोणत्याही प्रतिक्रीया देणार नाही असं मलिक यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.
आपल्या तीन पानी प्रतिज्ञापत्राच्या शेवटी मलिक यांनी, केंद्रीय तपास यंत्रणाचा राजकीय फायद्यासाठी होत असलेला गैरवापराबद्दल आणि अधिकाऱ्यांची वागणूक याबद्दल बोलण्यासाठी मला आडकाठी येणार नाही अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान जस्टीस काठावाला आणि जस्टीस मिलींद जाधव यांच्या खंडपीठाने वानखेडे परिवाराची बाजू मांडणारे वकील बिरेंद्र सराफ यांचं मलिकांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राबद्दल मत विचारलं.
ज्याला उत्तर देत असताना सराफ यांनी, जोपर्यंत ते प्रतिज्ञापत्रात लिहीण्याप्रमाणे वागणार आहेत तोपर्यंत आम्हाला कोणतीही समस्या नाही. परंतू यामधील शेवटची ओळ वाचली असता त्यांना राजकीय समस्या आणि अधिकाऱ्यांबद्दल बोलायचं आहे. मला याबद्दलही काहीच आक्षेप नाही परंतू त्यांनी वानखेडे परिवाराबद्दल काहीही बोलू नये असं सांगितलं. ज्यावर जस्टीस काठावाला यांनी नवाब मलिक यांची बाजू मांडणारे वकील चिनॉय यांना सूचना दिल्या.
“तुम्ही या अधिकाऱ्याविरुद्ध काहीही बोलणार नाही आहात. मि. चिनॉय हे सर्व काय चालू आहे याची तुम्हालाही माहिती आहे. ते एक मंत्री आहेत कोणी सामान्य माणूस नाहीत.” ज्यावर स्पष्टीकरण देताना मलिक यांच्या वकीलांनी नवाब मलिक समीर वानखेडेंबद्दल, त्यांच्या परिवाराबद्दल, सुट्ट्यांबद्दल किंवा भूतकाळात जे काही घडलं त्याबद्दल बोलणार नाहीत असं सांगितलं. परंतू मलिक यांना वानखेडे यांच्या प्रोफेशनल ड्युटीबद्दल बोलण्याचा अधिकार असल्याचंही मलिकांच्या वकिलांनी कोर्टासमोर सांगितलं.
वानखेडे परिवाराचे वकील सराफ यांनी यासाठी कोणताही आक्षेप न नोंदवल्यामुळे हायकोर्टाने नवाब मलिक यांचा माफीनामा मान्य केला आहे.
ADVERTISEMENT