मुंबई पोलिसांकडून अटक टाळण्यासाठी समीर वानखेडे यांनी बॉम्बे हायकोर्टात धाव घेतली आहे. समीर वानखेडे यांच्या विरोधात चार ठिकाणी भ्रष्टाचाराचे आरोप करत तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. त्यानंतर मुंबईचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी आदेश काढत चार जणांचं पथक या प्रकरणी चौकशी करणार असल्याचं म्हटलं आहे. या घडामोडी घडल्यानंतर समीर वानखेडे यांनी बॉम्बे हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.
ADVERTISEMENT
दरम्यान समीर वानखेडेंना यांना कोर्टाने दिलासा दिला आहे. समीर वानखेडेंना अटक करण्याआधी तीन दिवस आधी सूचित करावं लागेल. असं कोर्टाने म्हटलं आहे त्यामुळे समीर वानखेडेंना दिलासा मिळाला आहे.
समीर वानखेडेंनी के. पी. गोसावींच्या माध्यमातून शाहरुख खानकडे 25 कोटींची मागणी केली असा आरोप आहे. या प्रकरणातील एनसीबीचा साक्षीदार प्रभाकर साईल याने समोर येऊन आरोप केले आहेत. रविवारी प्रभाकर साईल समोर आला. त्याने काही सनसनाटी आरोप केले. त्यातला मुख्य आरोप हा होता की के. पी. गोसावीने शाहरुख खानकडे आर्यनला सोडण्याच्या बदल्यात 25 कोटी मागितले, त्यातले आठ कोटी समीर वानखेडेंना मिळणार होते. या आरोपानंतर एकच खळबळ माजली.
सोमवारी के. पी. गोसावी आणि मनिष भानुशाली यांनी समोर येत हे आरोप चुकीचे असल्याचं सांगितलं. एवढंच नाही तर समीर वानखेडे यांनीही हे सगळे आरोप फेटाळले. आर्यन खानला अटक करण्यात आली आणि त्यानंतर NCB आणि समीर वानखेडे या दोहोंची चर्चा सुरू झाली. या सगळ्या प्रकरणात नवाब मलिक यांनी काही आरोप केले होते. ज्या आरोपांमध्ये प्रमुख आरोप होता की ही सगळी कारवाई खोटी आणि बनाव आहे. मात्र या प्रकरणाला ट्विस्ट आला तो प्रभाकर साईलमुळे.
समीर वानखेडे विरूद्ध नवाब मलिक असाही सामना आपल्याला राज्यात रंगलेला पाहण्यास मिळतो आहे. समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक गेल्या तीन दिवसांपासून व्यक्तीगत पातळीवर आरोप करत आहेत. समीर दाऊद वानखेडे असा ट्विटरवर त्यांचा केलेला उल्लेख, समीर वानखेडे यांचं जात प्रमाणपत्र, त्यांचा निकाहनामा या सगळ्या गोष्टी नवाब मलिक यांनी समोर आणल्या आहेत.
दुसरीकडे समीर वानखेडे, त्यांची पत्नी क्रांती रेडकर, त्यांचे वडील ज्ञानेश्वर वानखेडे या सगळ्यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. नवाब मलिक हे गुंडगिरीचा वापर करत आहेत त्यांना समीर वानखेडे यांना पदावरून हटवायचं आहे त्यामुळे ते असे बेछुट आरोप करत आहेत असं क्रांती रेडकरने म्हटलं आहे. अशात आता समीर वानखेडेंच्या विरोधात चार तक्रारी दाखल झाल्याने मुंबई पोलीस दलातील चार अधिकारी या आरोपांची चौकशी करणार आहेत. त्यामुळे समीर वानखेडे यांच्या अडचणी कदाचित वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळेच त्यांनी बॉम्बे हायकोर्टात धाव घेतली आहे.
ADVERTISEMENT