शरद पवारांचे PM मोदींना खडे बोल : नागपूरच्या भाषणावरुन ‘शहाणपणा’चा सल्लाही दिला…

मुंबई तक

12 Dec 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 08:35 AM)

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी (११ डिसेंबर) नागपूर मेट्रो, समृद्धी महामार्ग आणि नागपूरमधील अनेकविध प्रकल्पाचे उद्घाटन केलं. यानंतर उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी आम आदमी पक्षासह विरोधी पक्षांवर टीका केली. मात्र त्यांच्या याच भाषणावरुन आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना खडे बोल सुनावले. तसंच त्यांना शहाणपणाचा सल्लाही दिला. ते आज वाढदिवसानिमित्त […]

Mumbaitak
follow google news

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी (११ डिसेंबर) नागपूर मेट्रो, समृद्धी महामार्ग आणि नागपूरमधील अनेकविध प्रकल्पाचे उद्घाटन केलं. यानंतर उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी आम आदमी पक्षासह विरोधी पक्षांवर टीका केली. मात्र त्यांच्या याच भाषणावरुन आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना खडे बोल सुनावले. तसंच त्यांना शहाणपणाचा सल्लाही दिला. ते आज वाढदिवसानिमित्त यशवंतराव चव्हाण सेंटरला आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

हे वाचलं का?

शरद पवार काय म्हणाले?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अनेक कर्तुत्ववान नव्या पिढीचे प्रतिनिधी आहेत. त्यांच्यामार्फत राज्याचा गाडा नीटनेटका चालवावा अशी अपेक्षा ठेवली तर काही चुकीचे नाही असे कर्तुत्व त्यांच्यामध्ये आहे. त्यामुळे साहजिकच अशांना प्रोत्साहित करण्याची भूमिका ही आम्ही लोकांनी घेतली पाहिजे, यातच आम्ही लक्ष द्यावे याची जाणीव करून देण्यासाठीच हा सोहळा याठिकाणी आयोजित केला असावा.

मी व माझ्या आसपासच्या वयाचे सर्व घटक नव्या पिढीला प्रोत्साहित करण्याची भूमिका ही अखंडपणाने केल्याशिवाय राहणार नाही. आज अडचणीच्या काळातून आपण जात आहोत. देशात भाजपचे राज्य आहे. लोकशाहीच्या मार्गाने राज्य आल्यानंतर त्याला विरोध करायचा नसतो. धोरण पसंत पडली नाही व ती समाजहिताची नसतील तर त्यासंबंधीची भूमिका घ्यायची असते.

पण राज्यकर्त्यांनी सुद्धा संपूर्ण देशातील प्रांतांकडे बघताना आपण देशाचे नेतृत्व करतोय याचे स्मरण केले पाहिजे. काल नागपूर येथे प्रधानमंत्र्यांनी केलेल्या भाषणात त्यांनी फार मोठ्या प्रमाणात विरोधकांवर टीका केली. जाहीर सभेला किंवा निवडणुकीच्या प्रचाराला गेले तिथे पक्षाची भूमिका मांडणे हा त्यांचा अधिकार आहे. परंतु रेल्वे, रस्ता, हॉस्पीटल अशा सरकारी कार्यक्रमाचे उद्घाटन देशाचा प्रधानमंत्री करतो. त्या व्यासपीठावर विरोधकांवर टिकाटिप्पणी मांडणे कितपत शहाणपणाचे आहे याचा विचार करण्याची वेळ आली आहे.

मी अनेक प्रधानमंत्र्यांचे कार्यक्रम पाहिले व भाषणंही ऐकली. निवडणुकीच्या प्रचाराला गेल्यानंतर सुद्धा विरोधी पक्षाची सरकारं असली तर त्यांच्यावर कधी पंडित जवाहरलाल नेहरूंनी टिप्पणी केली नाही. आपली भूमिका मांडली पण विरोधक, विरोधी पक्षनेते, विरोधी पक्ष याही लोकशाहीच्या संस्था आहेत त्या संस्थांचा सन्मान ठेवला पाहिजे हे सूत्र या देशाच्या स्वातंत्र मिळाल्यानंतर बहुतेक प्रधानमंत्र्यांनी पाळले. पण आजकाल पाळलं जात नाही, अशीही खंत त्यांनी व्यक्त केली.

    follow whatsapp