2019 ची निवडणूक ही महाराष्ट्राच्या राजकारणातली कायमच लक्षात राहिलेली निवडणूक असणार आहे. कारण ही निवडणूक भाजप आणि शिवसेनेने एकत्र लढवली होती. महायुतीला लोकांचा कौलही मिळाला होता. मात्र मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस झाले नाहीत. त्या महिन्याभरात काय काय नाट्यमय घडामोडी घडल्या हे सगळ्या महाराष्ट्रालाच माहित आहे. सरतेशेवटी महाविकास आघाडी स्थापन झाली आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. आता शरद पवार यांनी यावरून देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.
ADVERTISEMENT
काय म्हणाले शरद पवार?
‘निवडणुकीच्या आधीच मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन सांगत होते. मी त्यांना येऊच दिलं नाही.’ असं वक्तव्य शरद पवार यांनी उस्मानाबादमध्ये केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा उस्मानाबादमध्ये होता. त्यामुळे शरद पवार या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी फडणवीसांना हा टोला लगावला आहे. ‘उद्धव ठाकरे हे खूप चांगलं काम करत आहेत’ असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार जेव्हा भाजपकडून सुरू होता तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईन ही घोषणा दिली होती. ती घोषणा म्हणजे त्यांच्या भाषणाची ओळखच झाली होती. भाषण संपवत असताना ते ही घोषणा देत होते. तसंच शरद पवारांचं राजकारण आता संपलं आहे अशीही टीका त्यांनी त्यावेळी केली होती. मात्र देवेंद्र फडणवीस पुन्हा येऊ शकले नाहीत. आता त्या पुन्हा येईनच्या घोषणेवरूनच शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.
आणखी काय म्हणाले शरद पवार?
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या 52 वर्षांपासून मी काम करतोय. एक दिवसही सुट्टी मी घेतलेली नाही. जनतेने मला ५२ वर्षे काम करण्याची संधी दिली त्या जनतेच्या भवितव्याचा विचार केला पाहिजे. माझ्या मते माझ्यावर ती जबाबदारी आहे. एकदा सोडून मी चारदा मुख्यमंत्री झालो. मला महाराष्ट्राच्या जनतेने काही द्यायचं शिल्लक ठेवलंच नाही. कुणी तरी चारदा मुख्यमंत्री झालंय का? मला गेल्या ५०-५२ वर्षे निवडून देत आहेत. हे सगळं लोकांनी दिल्यानंतर आता जो काही काळ माझ्याकडे आहे त्यामध्ये लोकांच्या आयुष्यात परिवर्तन कसं होईल ही माझी भूमिका आहे.
मगाशी कुणीतरी सांगितलं मी आता ८०-८२ वर्षांचा झालो, म्हातारा झालो. मी काही म्हातारा झालेलो नाही. जोपर्यंत तुम्हा सगळ्यांची साथ आहे मी थकणार नाही आणि थांबणार नाही असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT