हिंदुत्वाची कास धरलेल्या राज ठाकरेंनी आपल्या सभांमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर थेट टीका करायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर राज्यात जातीयवाद वाढीला लागला असून शरद पवार हे नास्तिक असल्याचंही राज यांनी जाहीर सभेत बोलून दाखवलं. राज यांच्या टीकेला शरद पवारांनी याआधीच प्रत्युत्तर दिलं आहे.
ADVERTISEMENT
सातारा येथील एका कार्यक्रमात बोलत असताना शरद पवारांनी पुन्हा एकदा राज ठाकरेंना टोला लगावला आहे.
ज्यांनी जातीवादी म्हणून मला हिणवलं त्याचा मी आस्वाद घेतला. अशाप्रकारची वक्तव्य केल्यामुळे लोक हसतात, पण अशी वक्तव्ये ते गांभीर्यानं घेत नाहीत. ऐकतात आणि सोडून देतात, असंही पवार राज ठाकरेंचं नाव न घेता म्हणाले.
यावेळी बोलत असताना शरद पवारांनी ओबीसी आरक्षण आणि भोंग्याच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. ओबीसी आरक्षणाबाबत मुख्यमंत्री आणि जाणकार योग्य निर्णय घेतील. जो सगळ्यांना मान्य असेल असाच निर्णय होईल. त्याची अंमलबजावणी कधी होईल याकडे आमचं लक्ष असेल, असं शरद पवार म्हणाले.
देशात महागाई, बेकारी वाढली आहे. या विषयांकडे न पाहता भोंग्यांचा विषय घेतला जातोय. ज्यांना आधार नाही ते अशाप्रकारे लोकांचं मन भरकटवण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका पवारांनी राज यांच्यावर केली आहे.
ADVERTISEMENT