राकेश गुढेकर, प्रतिनिधी
ADVERTISEMENT
रत्नागिरी: एकनाथ शिंदे गटाचा मेळावा काल दापोलीमध्ये पार पडला. आदित्या ठाकरेंच्या सभेला उत्तर म्हणून हा मेळावा घेण्यात आला होता. यामध्ये शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवरती जोरदार टीका केली. ‘मी बाळासाहेबांचा मुलगा आहे, असं किती वेळा सांगणार? काही संशय आहे का? आम्ही कधी नाही म्हटलं आहे का? उद्धव ठाकरे बाळासाहेबांचा मुलगा नाही, असं कधी कुणी म्हणाल्याचं ऐकलंय का? तुम्हाला बाळासाहेबांचं नाव का सांगावं लागतं? तुमचं काही कर्तृत्व आहे का?’ असं रामदास कदम कालच्या सभेमध्ये म्हणाले होते. आता त्याला राष्ट्रवादीचे माजी आमदारम संजय कदम यांनी उत्तर दिलं आहे.
संजय कदमांचं रामदास कदमांवर टीकास्त्र
संजय कदम म्हणाले ”ज्या शिवसेनाप्रमुखांमुळे तुम्हाला आयुष्यभर आमदारकी मिळाली, मंत्री झालात, विरोधीपक्ष नेतेपद मिळालं, मुलाला आमदारकी मिळाली, त्या बाळासाहेबांच्या बाबत उद्धवजी त्यांचे आहेत की नाही संशय आहे का? हे वक्तव्य म्हणजे नरकात सुद्धा गेलेला माणूस करणार नाही. त्यामुळे अशा पद्धतीचं वक्तव्य केल्याने त्यांच्या तोंडात किडे पडतील, अशा कमेंट लोकांच्या येऊ लागल्या आहेत, त्यामुळे संपूर्ण कोकणी माणूस या रामदास कदमांचा निषेध करत आहे.”
रश्मी ठाकरे यांच्यावरती नाव न घेताल टीका
कालच्या सभेमध्ये रामदास कदमांनी भास्कर जाधवांपासून थेट उद्धव ठाकरेंना लक्ष केले. रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंवर मुख्यमंत्रीपदावरून गंभीर आरोप केले आहेत. उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या बैठकीत एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करायचं आहे, असं सांगितलं आणि नंतर एका रात्रीत काय झालं? असा सवालही केला.
याच सभेत रामदास कदमांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंचं नाव न घेता स्फोटक विधान केलंय. पत्नीच्या दबावामुळे मुख्यमंत्री झाले, कारण त्यांच्या पत्नीला वर्षा बंगल्यावर जायचं होतं असं वक्तव्यही रामदास कदमांनी केलं आहे.
योगेश कदमांची भास्कर जाधवांवरती टीका
दापोलीत काल योगेश कदमांच्या नेतृत्वात सभा पार पडली. यामध्ये योगेश कदमांनीही आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि भास्कर जाधवांवरती टीका केली आहे. योगेश कदम म्हणाले, ‘दोन दिवसांपूर्वी याच ठिकाणी चौकात काही कार्यकर्ते जमले होते. मी कधीही पातळी सोडून बोललो नाही. परवाच्या दिवशी राजकीय व्यक्ती किती खालची पातळी गाठू शकते हे गुहागरच्या एका माकडाने दाखवून दिलं’.
ADVERTISEMENT