सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील आपल्या वक्तव्यामुळे वादात सापडले आहेत. भाजप खासदार धनंजय महाडिक यांच्यावर टीका करताना राजन पाटील यांनी अश्लाघ्य भाषेचा वापर केल्याचा एक व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. सोलापूरमधील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचारातील हा व्हिडीओ आहे.
ADVERTISEMENT
काय म्हणाले राजन पाटील?
भीमा सहकारी साखर कारखाना निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राजन पाटील यांनी एक सभेला संबोधित केलं. यावेळी खासदार धनंजय महाडिक यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, निवडणूक भीमा कारखान्याची आहे की राजन पाटील यांच्या कुटुंबाची? हेच कळायला मार्ग नाही.
आमच्या पोरांना बाळ म्हणतो… आरं आम्ही पाटील आहोत. याला माहितीच नाही. पाटलांच्या पोरांना लग्नाच्याही आधी तुझ्याएवढी बाळं असतात. त्याचा आम्हाला अभिमान आहे. आमच्या पोरांना बाळं म्हणतोय, भीती घालतोय. आहो वयाच्या 17 व्या वर्षी 302 ची कलम भोगणारी आमची पोरं आहेत, अशी खालच्या पातळीची टीका त्यांनी केली.
राजन पाटील यांचं हे वादग्रस्त वक्तव्य मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. अगदी त्यांच्या पक्षातूनही त्यांना सुनावलं जाऊ लागलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी असंस्कृत आणि विकृत माणूस असं म्हणतं राजन पाटील यांचा समाचार घेतला.
ADVERTISEMENT